सावंतवाडी पोलिसांची कारवाई : दोन दिवसांची पोलिस कोठडी
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील एका चिरेखाणीत काम करणाऱ्या १९ वर्षीय युवतीवर त्याच चिरेखाणीतील कामगाराने ३ ऑक्टोबरच्या रात्री अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सदर प्रकरणी पाळत ठेवून मुख्य संशयिताला मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या दुसऱ्या फरार संशयित आरोपीला सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने जळगाव भुसावळ येथून ताब्यात घेतले. त्याला येथील न्यायालयात हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विकेंदर सिंग ( २५, रा. झारखंड असे त्याचे नाव असून अत्याचार झाल्याच्या घटनेपासून तो फरार होता.
सावंतवाडी तालुक्यातील एका गावात असलेल्या चिरेखाणीवर कामानिमित्त असलेल्या एका परप्रांतीय युवतीवर तेथेच काम करणाऱ्या थॉमस बा ( २१, रा. झारखंड )या परप्रांतीय युवकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता ही घटना घडली होती. याप्रकरणी थॉमस याला विकेंदर याने पाळत ठेवत मदत केल्याचे चौकशीत समोर आले होते. पीडित युवतीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या घटनेतील दोन्ही संशय घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यांच्या शोधार्थ सावंतवाडी पोलिसांनी आपली पथके रवाना केली होती. त्यानंतर थॉमस बा या प्रमुख संशयिताच्या गोवा राज्यातून मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.
मात्र, दुसरा संशयित विकेंदर सिंग हा पोलिसांना सापडून आला नव्हता. त्याच्या शोधार्थ रवाना झालेल्या दुसऱ्या पथकाने अखेर आज त्याला जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम, सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलिस हवालदार प्रविण वालावलकर, मंगेश शिंगाडे, गौरव परब त्यांच्या पथकाने केली.










