सायबर क्राईम, ऑनलाईन बँकिंग फसवणूकी पासून सजग राहाण्याचे आवाहन
कोळंब येथे “सिंधुदुर्ग पोलीस-संवादातून आधार” कार्यक्रम संपन्न
मालवण | प्रतिनिधी : आजच्या सोशल मिडयाच्या युगात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम तसेच ऑनलाईन बँकिंग फसवणूक सारखे गुन्हे वाढले आहेत. बहुतांशी जेष्ठ नागरीकांची मोठ्या प्रमाणात सायबर बँकिंग फसवणूक होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सोशल मीडिया फ्रॉड मध्ये जेष्ठ नागरिकांनी फसू नये, फ्रॉड कॉल, सोशल फ्रॉड जाहिरात यांच्या फसवणुकी पासून सावधान राहावे. जेष्ठ नागरिक हेल्पलाईन
क्रमांक ७०३६६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्या मांडव्यात. जेष्ठ नागरिकांच्या सेवे साठी सिंधुदुर्ग पोलिस मालवण पोलिस सदैव तत्पर आहेत. असे प्रतिपादन मालवण पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी केले.
सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांच्या संकल्पनेतून या वर्षाची दिवाळी ही जेष्ठ नागरिकां सोबत साजरी व्हावी या उद्देशाने तसेच समाजात घडत असलेल्या सायबर क्राईम, सायबर बँकिंग फसवणूक, विविध जाहिराती द्वारे होणाऱ्या फसवणुकी बाबत सिंधुदुर्ग पोलीस दल आणि मालवण पोलीस ठाणे कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत “सिंधुदुर्ग पोलीस-संवादातून आधार “या कार्यक्रमाचे कोळंब समर्थ मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रशांत पवार, ग्रामीण रुग्णालय मालवण डॉक्टर प्रतीक कदम, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रवींद्र वराडकर, सायबर पोलीस स्टेशन सिंधुदुर्गच्या धनश्री परब, निकिता परब, पोलीस पाटील संतोष जामसंडेकर व अन्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश माने यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग पोलिस सायबर सेलच्या धनश्री परब यांनी सायबर गुन्हे विषयक मार्गदर्शन केले. सायबर गुन्हा कसा घडला जातो. त्यापासून आपण कसे वाचले पाहिजे, आपल्या सोबत फ्रॉड कॉल वरून आर्थिकहानी होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी. फसवणूक झाली तर सायबर ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार करण्यासाठी १९३०, आणि १९४५ वर तक्रार कशी करावी, तसेच सिंधुदुर्ग पोलीस या वेबसाईटवर ई तक्रार कशी करावी याबाबत सखोल माहिती उपस्थित जेष्ठ नागरिकांना दिली. वधू वर सूचक मेळावे कॉल, विविध ऑफर फ्रॉड जाहिरात, सायबर क्राईम सारख्या गुन्ह्यात जेष्ठ नागरिकांनी फसू नये असे आवाहन ही करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत पवार यांनी आरोग्य विषयी माहिती जेष्ठ नागरिकांना दिली. उत्तम आहार दिनचर्या, व्यायाम, पायी चालणे, सामाजिक कार्यात सहभागी व्हा मित्र जमवा, नियमित आरोग्य तपसण्या करून घ्या, नैराश्य दूर ठेऊन नेहमी आनंदी जीवन जगा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले. आभार सुशांत पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी तालुक्यातील पोलिस पाटील, पोलिस कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
*जेष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी हा मुख्य उद्देश*
बहुतांशी जेष्ठ नागरिकांची मुले कामा निमित्त मुंबई, पुणे व अन्य शहरात अथवा परदेशात असतात. आशा वेळी घरी जेष्ठ नागरिकाना एकट्याने दिवाळी सण साजरा करावा लागतो. हा एकटेपणा जेष्ठ नागरिकांच्या मनात वाटू नये यासाठी त्यांना या कार्यक्रमात वेगळा आनंद मिळून दिवाळी साजरी केल्याचे समाधान मिळेल. हा मुख्या उद्देश या कार्यक्रमाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक आणि महिला जेष्ठ नागरिक उपस्थित होते.











