खेड : मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागातील झोन ४ अंतर्गत मुला-मुलींची आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा नुकतीच घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, रजिस्ट्रार संदीप मुनघाटे, क्रीडा समिती अध्यक्ष प्रा. सचिन ढवळे, क्रीडा शिक्षक संजय बोले आणि सर्व क्रीडा समिती सदस्य उपस्थित होते.
या स्पर्धेत कोकण विभागातील झोन ४ मधून मुलांचे १६ संघ आणि मुलींचे ५ संघ सहभागी झाले होते. सर्व सामने अत्यंत चुरशीचे आणि रोमांचक वातावरणात पार पडले.
मुलांच्या गटात गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीने प्रथम क्रमांक मिळविला, तर द्वितीय क्रमांक बी. बी. भा. की. महाविद्यालय वेंगुर्ले यांनी पटकावला. तृतीय क्रमांक ए अँड सी महाविद्यालय सावर्डे आणि चतुर्थ क्रमांक हेगशेटे महाविद्यालय रत्नागिरी यांनी मिळवला. मुलींच्या गटात गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीने प्रथम क्रमांक पटकावला. गोविंदराव निकम फार्मसी महाविद्यालय सावर्डे यांनी द्वितीय, जे. एस. एम. महाविद्यालय अलिबाग यांनी तृतीय आणि घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन यजमान घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संघांकडून आणि उपस्थितांकडून घरडा महाविद्यालयाचे कौतुक करण्यात आले.












