राजापूर | प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत एकसंघ व एकदिलाने काम करून आपल्याला सर्व ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा फडकवायाचा हे लक्षात ठेऊन त्यासाठी आजपासूनच कामाला लागा असे आदेश आमदार किरण सामंत यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. आपल्याला विकासाचे राजकारण करायचे असून त्यासाठी पक्ष संघटन अधिक बळकट करायचे आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष व माजी जि. प. सदस्य आबा आडिवरेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह असून त्यांच्या पक्षप्रवेशाने नक्कीच संघटनेला बळकटी मिळेल असा विश्वासही आ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
राजापूर तालुक्याच्या पुर्व विभागात कृषीच्या माध्यमातुन तर पश्चिम विभागात पर्यटनाच्या माध्यमातुन कशा प्रकारे विकास करता येईल यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी आ. सामंत यांनी सांगितले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष व माजी जि. प. सदस्य गोपाळ उर्फ आबा आडिवरेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला. तर हरळ गावच्या सरपंच माधवी पांचाळ यांसह ग्रामपंचायत सदस्य व हरळ गावातील उ. बा. ठा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. आ. किरण सामंत यांनी या सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
तळवडे येथील प्रभावती सभागृहात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्षा दुर्वा तावडे, तालुकाप्रमुख दीपक नागले, अविनाश पराडकर, दीपक बेंद्रे,आत्माराम सुतार, पाचल सरपंच बाबालाल फरार, सुरेश ऐनाकर,बाबू वेरवडे, प्रतिक मटकर, विभागप्रमुख शैलेश साळवी, सुनिल गुरव, अमर जाधव, रवींद्र सावंत, संतोष सावंत, विकास रेघे, मंदार सप्रे, गणेश तावडे, श्वेता पवार, विधी पांचाळ, बाळा चव्हाण, बाबा सावंत, जगदीश उर्फ सोनू पाथरे, तुषार पांचाळ, महादेव गुरव, संदीप बारस्कर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आ. किरण सामंत यांनी राजापूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असल्याचे नमुद करत आपण विकासाच राजकारण करायचे आहे असे नमुद केले. तर आबा आडिवरेकर यांचा प्रवेश हा पक्षसंघटनेला नवी ऊर्जा देणारा क्षण आहे असे सांगतानाच पक्षात आलेल्या प्रत्येकाचा योग्य सन्मान केला जाईल असेही सांगितले. तर लवकरच जिल्हाध्यक्ष राहुल पंडीत हे जिल्हाकार्यकारणी जाहिर करणार असून त्यात प्रत्येकाला योग्य संधी दिली जाईल. मात्र ज्यांना पद मिळेल ते आणि ज्यांना मिळाले नसेल ते असे सगळेच आपण निष्ठावान शिवसैनिक आहोत हेच आपले मोठे पद आहे हे लक्षात ठेवून पक्षवाढीसाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
आपल्याला महायुती म्हणून लढायचे असून सगळया निवडणूका जिंकायच्या आहेत, अगदी ग्रामपंचायत पासून प. स. जि. प. नगर पंचायत, नगर परिषद व नगरपालिकांवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे हे लक्षात ठेवा आणि कामाला लागा असा कानमंत्र आ. सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांचे स्वप्न आपल्याला साकार करायाचे आहे हे लक्षात ठेवा असेही नमुद केले.
याप्रसंगी बोलताना आबा आडिवरेकर यांनी शिवसेना ही जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारी संघटना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना. उदय सामंत, आ. किरण सामंत यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या विकासाच्या धोरणात सहभागी होण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश करत आहे असे सांगितले. यापुर्वी आपण कै. भाईसाहेब हातणकर यांच्यासोबत काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केले होते. आता शिवसेनेतही शेवटच्या श्वासापर्यंत आपण निष्ठेने काम करू आणि आ. किरण सामंत यांचे काम व कार्य जनतेपर्यंत पोहचविताना पक्ष संघटना बळकट करू असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.
याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंदूभाई देशपांडे यांनी उपस्थित रहात आबा आडिवरेकर यांच्या पक्षप्रवेशाला शुभेच्छा दिल्या. तसेच आ. किरण सामंत यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक केले. याप्रसंगी दीपक नागले, दुर्वा तावडे, दीपक बेंद्रे, मंगेश पांचाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
आबा आडीवरेकर यांच्या समवेत खूशीराम मोरे, विनोद पवार, अमित चिले, संजय गुरव, जगदीश गुरव, सखाराम म्हाडये, संजीव मोरे, जगन्नाथ घडशी, आत्माराम नारकर, नितिन शिंदे, विजय पावसकर, रमजान बलबले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
तर हरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच माधवी पांचाळ यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच हरळ गावातील उबाठा गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे आ. किरण सामंत यांनी पक्षात स्वागत केले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमप्रसंगी आप्पा साळवी, सुरेश ऐरणारकर, संदीप बारस्कर, गायत्री साळवी, विहंग खानविलकर, अमीत साळवी, शिवसेना नाटे विभाग प्रमुख मनोज आडवीलकर, अरवींद लांजेकर यांसह शिवसेनेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.











