गणेशखिंड रस्त्यावर ड्रेनेज झाकण चोरी करणारे तिघे जेरबंद; सतर्क पोलिसांमुळे अपघात टळला

ऑटोरिक्षातून चोरीचे झाकण नेताना रंगेहात पकडले
भंगारात विक्रीसाठी कट; पोलिसांनी माल जप्त केला

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर ड्रेनेज चेंबरचे लोखंडी झाकण चोरी करणाऱ्या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. सिमला ऑफिस चौकात घडलेल्या या प्रकारात सतर्क पोलिसांमुळे मोठा अपघात टळला. चोरीचे झाकण ऑटोरिक्षातून नेत असताना आरोपींना पकडण्यात आले. जप्त केलेले झाकण पीएमसीच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणामुळे शहरातील सुरक्षेच्या मुद्द्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील सिमला ऑफिस चौकात ड्रेनेज चेंबरचे लोखंडी झाकण चोरी करणाऱ्या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी १० वाजता ताब्यात घेतले. हे तिघेही सेनापती बापट रस्त्यावरील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चौकात ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार शेषराव भालेराव यांना आरोपी झाकण चोरताना दिसले. त्यांनी तत्काळ कारवाई करत चोरीचे झाकण घेऊन जाणारी ऑटोरिक्षा थांबवली आणि तिघांना पकडले.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, रस्त्यावरून ड्रेनेज झाकण गायब झाल्यास गंभीर अपघात होऊ शकतात. सतर्क पोलिसामुळे ही चोरी उघडकीस आलीच, शिवाय संभाव्य अपघातही टळला.

पोलिसांनी जड लोखंडी झाकण जप्त केले असून ते तत्काळ पीएमसी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली ऑटोरिक्षाही जप्त करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात आरोपींनी झाकण भंगारात विकून झटपट पैसे कमावण्याचा हेतू असल्याचे समोर आले, असेही दिघावकर यांनी स्पष्ट केले.