आमदार निलेश राणेंच्या वाढीव निधीच्या मागणीला शासनाचा प्रतिसाद

माझ्यासह राज्यातील ५४ नवीन आमदारांना पाच कोटींचा अतिरिक्त निधी; आता विकासाची चिंता नको-आ. किरण सामंत
आ. निलेश राणे म्हणजे विकासासाठी धडपडणारे नेतृत्व

राजापूर | प्रतिनिधी : शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीतील सभेत कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी रत्नागिरीसारखाच प्रत्येक मतदार संघाचा विकास झाला पाहिजे व त्यासाठी आंम्हाला वाढीव निधी द्यावा अशी आग्रही मागणी ना. शिंदे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार तात्काळ प्रथमच निवडून आलेल्या आमदारांसाठी पाच कोटीचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता विकासाची चिंता करू नका तुंम्ही फक्त प्रामाणिकपणे व निष्ठेने महायुती सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचवा असे आवाहन आ. किरण सामंत यांनी केले आहे.
तळवडे येथे झालेल्या एका पक्ष प्रवेश कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १६ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी स्वातंत्र्यविर सावरकर नाटयगृहात शिवसेनेच्या जिल्हयातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एक मेळावा झाला. यावेळी बोलताना कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री ना. शिंदे यांच्याकडे या वाढीव निधीसाठीची आग्रही मागणी केली. राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदार संघात केलेल्या विकास कामांचे आ. राणे यांनी कौतुक केले. आंम्हाला देखील आमच्या मतदार संघात विकासाला गती द्यावयाची आहे, मात्र अपुऱ्या निधीमुळे कधी कधी ते शक्य होत नाही. तरी आंम्हाला खास करून आम्हा नव्याने प्रथम निवडून आलेल्या आमदारांना आमच्या मतदार संघातील विकास कामांसाठी वाढीव निधी द्यावा अशी मागणी केली. याची दखल ना. शिंदे यांनी आपल्या भाषणात घेत आ. निलेश राणेंच्या मागणीचा नक्कीच आंम्ही सकारात्मक विचार करू अशी ग्वाही दिली होती.
त्यानंतर मुंबईत जाताच त्यांनी अशा प्रकारे नवीन आमदारांसाठी पाच कोटी वाढीव निधी देण्यात येईल असे जाहिर केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी ही मागणी मान्य करून आ. निलेश राणेच नाहीत तर माझ्यासह राज्यात प्रथमच निवडून आलेल्या आंम्हा ५४ आमदारांना हा निधी दिला आहे.
आ. निलेश राणे हे कायमच पक्ष संघटना आणि पक्षासाठी निष्ठेने व जीव ओतुन काम करताना पहावयास मिळते. विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे एक तडफदार नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे, त्यांच्या शब्दालाही तेवढेच वजन आहे. त्यांनी मागणी केल्यामुळेच हा निधी मिळाला आहे त्यामुळे त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत अशा शब्दात आ. सामंत यांनी आ. राणे यांचे कौतुक केले. आपल्या पक्ष नेतृत्वासाठी, पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी झोकून देऊन काम करणारा झटणारा असा निलेश राणेंसारखा आमचा आमदार आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमुद केले.