भोसले फार्मसी कॉलेजच्याविद्यार्थिनींना केंद्रशासनाची रिसर्च स्कॉलरशिप जाहीर

सावंतवाडी । प्रतिनिधी :यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज, सावंतवाडी येथील दोन गुणवंत विद्यार्थिनींना केंद्र शासनाची प्रतिष्ठेची ‘पुणे नॉलेज क्लस्टर’ रिसर्च स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थिनींना त्यांच्या संशोधन कार्यात मोठी आर्थिक मदत मिळणार असून, कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

बी.फार्मसी (B.Pharm) अंतिम वर्षात शिकणाऱ्या पौर्णिमा महाले आणि एम.फार्मसी (M.Pharm) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या भक्ती पालेकर या विद्यार्थिनींना ही स्कॉलरशिप अनुक्रमे तीन व सहा महिन्यांसाठी मिळाली आहे.

या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना भरीव आर्थिक पाठबळ मिळणार आहे. पौर्णिमा महाले यांना दरमहा दहा हजार रुपये याप्रमाणे तीन महिन्यांसाठी एकूण तीस हजार रुपये, तर भक्ती पालेकर यांना दरमहा पंधरा हजार रुपये याप्रमाणे सहा महिन्यांसाठी एकूण नव्वद हजार रुपये अशी आर्थिक मदत मिळणार आहे.

प्रधान वैज्ञानिक सल्लागार, भारत सरकार यांच्या वतीने स्थापन झालेल्या ‘पुणे नॉलेज क्लस्टर’ या संस्थेमार्फत या शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते. या उपक्रमातून नवकल्पना, संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते.

या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी विद्यार्थिनींना कॉलेजचे फार्मास्युटिक्स विभागप्रमुख डॉ. रोहन बारसे आणि प्राचार्य डॉ. विजय जगताप यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थिनींच्या या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले आणि संपूर्ण संचालक मंडळाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील संशोधन आणि शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या स्कॉलरशिपमुळे कॉलेजमधील अन्य विद्यार्थ्यांनाही संशोधन कार्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.