राजकारणात कोणीही कोणाचा दिर्घकाळ मित्र नसतो आणि दिर्घकाळ शत्रूही नसतो
वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर
..स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका म्हटल्या की सहाजिकच त्या निवडणुका गाव असो की शहर त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. त्यातच मधल्या सात-आठ वर्षानंतर या निवडणुका होत आहेत. निवडणुका लढवण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असणार आहेत. सत्ताधारी पक्षात इच्छुकांची संख्या ही नेहमीच मोठी असते. तशी ती संख्या या निवडणुकीतही असलेली पहायला मिळते. यातूनच मग निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही की सहाजिकच इच्छुकांबरोबरच नाराजांची संख्याही मोठी असते. कोकणातही सर्वच पक्षांमध्ये जसे इच्छुक आहेत तसे नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली नाही यासाठी नाराजही आहेत. महाराष्ट्रात कोकणाच राजकारण नेहमीच फारच वेगळ असत……..
…,
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अर्ज भरणे, उमेदवारी अर्ज मागे घेणे, छाननी अशा निवडणुकीतील सर्व प्रक्रिया पार पडत आहेत. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कोणत्या राजकीय पक्षाने दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाशी कधी कसा घरोबा केला हे खरतर कोणालाच कळलेले नाही. असे राज्यातील चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका म्हटल्या की सहाजिकच त्या निवडणुका गाव असो की शहर त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. त्यातच मधल्या सात-आठ वर्षानंतर या निवडणुका होत आहेत. निवडणुका लढवण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असणार आहेत. सत्ताधारी पक्षात इच्छुकांची संख्या ही नेहमीच मोठी असते. तशी ती संख्या या निवडणुकीतही असलेली पहायला मिळते. यातूनच मग निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही की सहाजिकच इच्छुकांबरोबरच नाराजांची संख्याही मोठी असते. कोकणातही सर्वच पक्षांमध्ये जसे इच्छुक आहेत तसे नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली नाही यासाठी नाराजही आहेत. महाराष्ट्रात कोकणाच राजकारण नेहमीच फारच वेगळ असत. कोकणामध्ये निवडणुक कोणतीही मग ती ग्रामपंचायत असो की लोकसभेची निवडणुक असली तरीही कोकणच्या राजकारणात केंद्रस्थानी राणेच असतात. कोकणाच्या राजकीय इतिहासाची मांडणी करताना १९९० पर्यंत मागे गेल्यास १९९० पासूनच्या सर्वच निवडणुका या माजी केंद्रिय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांच्या नावाभोवतीच फिरत राहिल्या आहेत.
कोकणातील यावेळच्या निवडणुकांमध्ये रायगडमध्ये महायुतीत वेगळी राजकीय मांडणी झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यामध्ये विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री ना. भरतशेठ गोगावले आणि चार आमदार असा कधी उघड तर बऱ्याचवेळा सुप्त संघर्ष रायगडच्या राजकारणात राहिला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे रायगडच राजकारण नेहमीप्रमाणेच तापलेलं राहिलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत फुट पडलेली दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा व तीन नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात महायुती झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपा अशी महायुती झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या फार जुन्या असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट व भाजपा अशी युती झाली आहे. तर रत्नागिरी नगरपरिषदेत उबाठाकडून निवडणुक प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न झाला आहे. देवरूख, गुहागर आणि लांजा या नगरपंचायतीची निवडणुक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिका निवडणुकीत भाजपा वैभव खेडेकर आणि माजी मंत्री रामदास कदम व मंत्री ना.योगेश कदम यांनी एकत्र येत महायुतीतून ही निवडणुक लढवली जात आहे. राजापूर नगर परिषद निवडणुकीत माजी आमदार श्रीमती हुस्नबानू खलिपे काँग्रेसतर्फे निवडणुक रिंगणात उतरल्या आहेत. तर चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत चिपळूणचे माजी आमदार, माजी नगराध्यक्ष रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे निवडणुक रिंगणात उतरले आहेत. चिपळूणमध्ये आ. भास्कर जाधव रमेश कदम यांच्या सोबत आहेत. रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेना भाजपा महायुती, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी लढत रत्नागिरीत पहायला मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देवरूख आणि गुहागर या नगरपंचायती नगराध्यक्ष भाजपाला देण्यात आले तर लांजा नगरपंचायत आणि राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या नगर परिषदा भाजपाने महायुतीतील शिंदे सेनेला दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात शह काटशह राजकारण सुरू आहे.चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत उबाठामध्ये आ. भास्कर जाधव व माजी खा. विनायक राऊत या दोन गटातील सुप्त संघर्ष सुरु आहे.यातूनच आ. भास्कर जाधव यांनी नगराध्यक्ष पदासाठी उबाठाचा उमेदवार असतानाही जाहीर पाठींबा दिला आहे.उबाठाकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणारे राजू देवळेकर हे विनायक राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात . उबाठा उमेदवार असतानाही आ. भास्कर जाधव यांनी रमेश कदम यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.चिपळूणमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट एकला चलो रे आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण या फार फार जुन्या असलेल्या नगरपरिषद आहेत. तर कणकवली नगर पंचायतीची निवडणुक होत आहे. सावंतवाडीतील राजघराण्यांच्या स्नुषा श्रध्दाराजे भोसले निवडणूक रिंगणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष तसेच महाविकास आघाडीतील घटकपक्ष जिल्ह्यात स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत.
महायुतीतील भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट या तर्फे निवडणुक लढविली जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस घटक पक्षाने या निवडणुकीत स्वबळाचा नारा देत निवडणुक रिंगणात उतरले आहेत. तर उबाठाकडून कणकवलीत शहर विकास आघाडीत, आणि मालवण, सावंतवाडी, वेंगुर्लेत स्वतंत्र निवडणुक लढवत आहेत. कोकणात निवडणुकीत नेहमीप्रमाणेच कणकवली नगरपंचायत निवडणुक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. यावेळच्या निवडणुकीत ‘‘राजकारणामध्ये दिर्घकाळ कोणीही कोणाचा मित्र नसतो आणि राजकारणात दिर्घकाळ कोणी कोणाचा शत्रू नसतो’’ हे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखीत केले आहे. सिंधुदुर्गात भाजपाच्या प्रचाराची आघाडी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे सांभाळत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी मंत्री आ. दिपक केसरकर, मालवण-कुडाळचे आ.निलेश राणे पहात आहेत. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा एकदा चर्चेत आणि लक्षवेधी ठरत आहेत हे आजचे चित्र पुढील आठवड्यात हे चित्र अधिक गडद होईल. जिल्हापरीषद,पंचायत समिती निवडणूकीत त्याचे पदर अजूनही ऊलगडले जातील.












