​मळगाव घाटात इको कार दरीत कोसळून ७ जण जखमी

गांजील माशांच्या हल्ल्याने मदतकार्यात अडथळे

​सावंतवाडी:
सावंतवाडी-रेडी राज्यमार्गावर मळगाव घाटात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सावंतवाडीतील शिरसाट कुटुंबाची इको कार २० फूट दरीत कोसळली. या अपघातात एकाच कुटुंबातील सात जण जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

​शहरातील सालईवाडा येथील शिरसाट कुटुंब गोव्यातील एक धार्मिक कार्यक्रम आटोपून परतत असताना हा अपघात घडला. मळगाव घाटातील वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाची धडक बसल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कार संरक्षक रेलिंग तोडून थेट दरीत कोसळली. कार एका झाडावर आदळल्याने त्यावरील गांजील माशांचे (मधमाशांचे) मोहोळ उठले आणि त्यांनी अपघातग्रस्तांवर हल्ला केला.

​या अपघातात रजत मंगेश शिरसाट (६८), श्रीधर रंजन शिरसाट (३०), जयश्री विश्वनाथ शिरसाट (६५), हर्ष महेश शिरसाट (१८), उमा मंगेश शिरसाट (५६), मंगेश महेश शिरसाट (६०) आणि रंजन शिरसाट (६३) हे सात जण जखमी झाले आहेत.

​घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, मायकल डिसोजा, विशाल बांदेकर, राजू राहुल, मनोज नार्वेकर, नारायण चव्हाण, बाळा नार्वेकर, शुभम कळसुलकर, सुधीर जडिये, सचिन हरमलकर, राजू परब आणि गणेश पेडणेकर यांनी तातडीने धाव घेतली. मधमाशांचा त्रास होत असतानाही या तरुणांनी जखमींना बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक लोहकरे, सुरेश पाटील, शिंगाडे, संभाजी पाटील आणि मोरबाळे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.