ऑन कॉल रक्तदाता संघटनेच्या सदस्यांकडून रुग्णांना जीवनदान 

पिता-पुत्रासह पाच रक्तदात्यांचे तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी केले रक्तदान

सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेच्या पाच नियमित रक्तदात्यांनी दोन वेगवेगळ्या रुग्णांच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी रक्तदान करून त्यांना मोलाचे जीवनदान दिले आहे. विशेष म्हणजे यात पिता-पुत्राने एकत्रितपणे रक्तदान केले, तसेच एका रुग्णाच्या मुलानेही सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले आहे.

रत्नागिरी येथील सुमन हरीश सामंत यांच्यावर जीएमसी हॉस्पिटल, बांबोळी येथे बायपास शस्त्रक्रिया सुरू असताना, त्यांना ‘ए पॉझिटिव्ह’ रक्ताची तातडीने गरज भासली. ही गरज लक्षात घेऊन ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दिनेशजी गावडे आणि त्यांचे चिरंजीव आर्य गावडे यांनी त्वरित जीएमसी रक्तपेढी, बांबोळी येथे जाऊन रक्तदान केले. या पिता-पुत्रांनी यापूर्वी सुद्धा अनेकवेळा एकत्र रक्तदान केलेले आहे आणि पुन्हा एकदा त्यांना हा सामाजिक योग जुळून आला. याचवेळी संस्थेच्या राष्ट्रीय वेटलिफ्टर तथा ब्युटी पार्लर व्यवसायिका स्मिता पोटे (मळगाव) आणि उमेद अभियान ऑडिटर निधी म्हापसेकर (ओटवणे) या दोन महिला रक्तदात्याही रक्तदान करण्यासाठी सज्ज होत्या, मात्र रक्ताचा कोटा पूर्ण झाल्याने त्यांना राखीव ठेवण्यात आले.

त्यानंतर मोहन मायबा सावंत या रुग्णाला फ्रॅक्चरमुळे गॅलॅक्सी हॉस्पिटल, गोवा येथे तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेसाठी त्यांना ‘ए पॉझिटिव्ह’ रक्ताच्या तीन युनिट्सची तातडीने गरज भासली. या गरजेनुसार संस्थेचे नियमित रक्तदाते राजू नांदगावी (पणजी) आणि वैभव रेडीज (सांगेली ता. सावंतवाडी) यांनी अजिल्लो रक्तपेढी, गोवा येथे जाऊन रक्तदान केले. विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकीची भावना म्हणून रुग्णाचे चिरंजीव कु. अमन सावंत यांनीदेखील रक्तदान केले. अमन यांचे रक्त दुसऱ्या एका गरजवंत रुग्णासाठी उपयोगी ठरले.

दोन्ही रुग्णांची रक्ताची गरज यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ‘ऑन कॉल रक्तदाते’ संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे, कार्याध्यक्ष महेश रेमुळकर व संस्थेचे नियमित रक्तदाते आर्मीमॅन राहुल सावंत (ओवळीये) यांनी विशेष प्रयत्न केले आणि तातडीने रक्त उपलब्ध करून दिले. या पाचही रक्तदात्यांच्या वेळेवर मदतीमुळे दोन्ही रुग्णांना जीवनदान मिळाले असून, त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.