माडखोल शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून वॉटर डिस्पेन्सरची भेट 

विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाण्याचा स्त्रोत उपलब्ध

सावंतवाडी । प्रतिनिधी :

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा माडखोल नं. १ च्या विद्यार्थ्यांना आता स्वच्छ, सुरक्षित आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा लाभ घेता येणार आहे. शाळेचे माजी विद्यार्थी तथा शिवसेना ओबिसी सेल तालुकाप्रमुख वासुदेव अशोक होडावडेकर यांनी नुकताच आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेला एक अत्याधुनिक वॉटर डिस्पेन्सर भेट म्हणून प्रदान केला आहे. होडावडेकर यांच्या या बहुमोल योगदानामुळे विद्यार्थ्यांना आता गरजेनुसार थंड आणि गरम पिण्याचे पाणीही सहज उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अत्यावश्यक प्रश्न सुटला आहे.

होडावडेकर यांनी दाखविलेली उदारता आणि शाळेप्रती असलेला जिव्हाळा प्रेरणादायी आहे. आपल्या शालेय जीवनाचा आधार असलेल्या संस्थेसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ या कृतीतून स्पष्ट होते. त्यांच्या या योगदानामुळे मुलांच्या शालेय जीवनात आनंद, सुरक्षितता आणि उत्साह वाढणार आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

होडावडेकर यांच्या या मौल्यवान कृतज्ञतेच्या भेटीबद्दल शाळा परिवाराच्या वतीने हृदयपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या या समाजहिताच्या दृष्टिकोनाचे आणि शाळेविषयीच्या जिव्हाळ्याच्या भावनेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.