विधानभवनातून
संतोष वायंगणकर
नागपूर विधीमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या आमदारांसाठी मुख्यमंत्री निवासस्थानी ब्रेकफास्टच आयोजन केल होत. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेकफास्टसाठी निमंत्रित करून पार पडलेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत स्वतंत्र निवडणुका लढविल्या गेल्याने ताणले गेलेले संबध या ब्रेकफास्ट निमित्तानेही एक प्रयत्न रहातो.
महायुतीती ल सर्व घटकपक्ष अधिक जवळ येतील. लवकरच होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकाना सामोरे जाताना महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढविल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तशी चर्चाही विधीमंडळाच्या प्रांगणात होत होती. आज विधानसभेत महसूल अधिनियमातील करण्यात येत असलेल्या बदलाच्या विधेयकावर चर्चा झाली. या चर्चेत अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळच्या अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणजे विरोधी पक्ष कुठे दिसतही नाही. सरकारला अडचणीत आणणे सोडाच पंरतु काही महत्त्वाच्या आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करणे अपेक्षित होते. पंरतु तसा प्रयत्नही विरोधकांकडून होताना दिसला नाही. शिवसेना ठाकरे गटाचा जीव मुंबई महानगर पालिकेत अडकला आहे. यामुळे सहाजिकच त्यांच सार लक्ष मुंबई महानगर पालिका निवडणुकीकडे लागले आहे. विधानसभेत अनेक आमदारांना प्रश्न मांडायचे होते पंरतु दिवसभरातील सभागृहातील कामकाजाचे नियोजन सांभाळण्यासाठी विधानसभा अध्यक्षानी ठराविक वेळ दिला. यात सभागृहातील काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. दिवसभरात एकीकडे विधीमंडळाचे कामकाज होत असताना दुसरीकडे मंत्र्यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठकाही होत होत्या. आ. निलेश राणे यांनी वाळू व्यावसायिकांवर होणाऱ्या कारवाई संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. वाळू उत्खननाची महसूल कडून टेंडर काढण्यात येत नाही. वेळीच टेंडर प्रक्रिया पार पाडली जात नाही. आणि उलट तहसीलदार कडून हप्ते वसूल केले. नाहक त्रास दिला. एकतर अधिकृतपणे प्रक्रिया पार पाडावी किंवा वाळू व्यावसायिकांना चोर म्हणून तरी कारवाई करावी असे आ. निलेश राणे यांनी सभागृहात केली. आ. निलेश राणे यांनी कोकणातील शेतकर्यांवर अन्याय होत आहे. अतिवृष्टीत जे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. कोकणातील शेतकर्यांना मोठी आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आ. निलेश राणे यांनी विधानसभेत केली. वैभववाडी -कोल्हापूर रेल्वे मार्ग प्रकल्प होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढील कार्यवाहीचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी देताना भू संपादनाचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिल्याचे विधानसभेत सांगितले. आज दिवसभर विधीमंडळात चर्चा आणि विधानभवनावर विविध मागण्यांसाठी मोर्चा येतच होते.









