लांजा येथे उत्साहात पार पडला दिव्यांग बांधवांचा आनंद मेळावा

लांजा (प्रतिनिधी): जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग जनकल्याण संस्था लांजाच्या वतीने आयोजित दिव्यांग आनंद मेळावा नुकताच कुलकर्णी काळे छात्रालय लांजा येथे विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिव्यांग समन्वय समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अशोक भुस्कुटे हे उपस्थित होते. तसेच आर एच पी फाउंडेशन रत्नागिरी चे अध्यक्ष सादिक नाकाडे, दिव्यांग सेवा संस्था चिपळूणचे अध्यक्ष भारती नाटेकर, लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, विस्तार अधिकारी श्री लोखंडे, तसेच समीर नाकाडे, दिव्यांग जनकल्याण संस्था लांजा चे अध्यक्ष संजय सुर्वे, तसेच शांताराम लाड, श्रावणी शिंदे, पुष्पा चव्हाण, सचिन माजळकर, रवींद्र निवळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांची मनोगते झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग दाखले आणि रेल्वे पास यांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा सन्मान सोहळा पार पडला. तसेच संस्थेच्या सभासदांना ओळखपत्र देखील वितरण करण्यात आले.
यानंतर दिव्यांग बांधवांचे विविध खेळ तसेच दिव्यांग कला बहर आदी कार्यक्रम पार पडले.‌ त्यानंतर दिव्यांग जनकल्याण संस्थेचे उपाध्यक्ष किरण धनावडे यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना संदर्भात मार्गदर्शन केले. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र काढणे, नूतनीकरण करणे, यु.डी. आयडी कार्ड काढणे दिव्यांग ड्रायव्हिंग लायसन्स, फिटनेस सर्टिफिकेट, रेल्वे /बस पास काढणे, संजय गांधी पेन्शन योजना, दिव्यांग विवाह निधी, दिव्यांग सहाय्यभूत साधने, दिव्यांग राखीव निधी आदी बाबत त्यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना सखोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यांग मित्र किरण धनावडे यांनी केले तसेच नियोजन व्यवस्था संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे ,उपाध्यक्ष किरण धनावडे, कार्याध्यक्ष सचिन तांबे यांनी केले.‌ संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे ,उपाध्यक्ष किरण धनावडे, दीपक बाईंग, मयूर जाधव, श्री धुमक श्री कुडकर, शगुप्ता नाईक आदींसह अन्य कार्यकारणी मंडळ, पदाधिकारी ,सदस्य यांनी मेहनत घेतली.