पिंपरीगावमध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री; 24 रिले जप्त

36 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, पुरवठादाराचा शोध सुरू

पिंपरीगाव परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत 36 हजार रुपये किमतीच्या 24 रिले जप्त केल्या आहेत. या कारवाईनंतर मांजा पुरवठा करणाऱ्या दापोडी येथील व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला आहे.


पुणे : पिंपरी पोलिसांना पिंपरीगाव येथील एका बंद इमारतीत नायलॉन मांजा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत छापा टाकला.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सुनील भदाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. छाप्यात तरुणाच्या ताब्यातून प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या तब्बल 24 रिले जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे 36 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस चौकशीत संबंधित तरुणाने मांजा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगितले आहे. हा पुरवठादार दापोडी परिसरातील असल्याचे समजते. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली असून लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नायलॉन मांजा प्रतिबंधित असून त्याचा वापर व विक्रीमुळे पक्षी, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.