शिक्षणाबरोबरच संस्कार उपयुक्त असून,अशा उपक्रमामधून जबाबदार, स्वावलंबी नागरिक घडण्याची प्रक्रिया निर्माण होते– संदेश पटेल- सावंत !
फोंडाघाट / कुमार नाडकर्णी —– येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत निवासी श्रमसंस्कार शिबिर ब्रम्हनगरी येथे उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा समारोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. संदेश सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे होते. व्यासपीठावर एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीश राणे, डॉ. बाजीराव डफळे व प्रा. प्रवीण हिंदळेकर हे मान्यवर उपस्थित होते.
शिबिरा दरम्यान शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान, व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्व विकास, श्रमप्रतिष्ठा, सहजीवन, आरोग्य शिक्षण, उद्योजकीय प्रशिक्षण, शोषक खड्डे निर्मूलन, हस्तकला उद्योगास भेट, मानसिक आरोग्य, जलव्यवस्थापन, आधुनिक युगातील दृष्टीकोन, मोबाईल तंत्रज्ञानाचा योग्य वापर अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व उपक्रम राबविण्यात आले. यासोबतच गटचर्चा, समाज प्रबोधनात्मक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थीनी प्रतिनिधी किरण कदम व विद्यार्थी प्रतिनिधी चेतन डोंगरे यांनी मनोगत व्यक्त करताना, सांगितले की, या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, संघभावना आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. पुस्तकी शिक्षणासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी या शिबिरामुळे मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.प्रमुख पाहुणे श्री. संदेश सावंत आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, महाविद्यालयातील प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. शिक्षणाबरोबरच संस्कार आवश्यक असून अशा उपक्रमांतून सुजाण, जबाबदार आणि स्वावलंबी नागरिक घडविण्याची प्रक्रिया सुरू होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास होतो. भविष्यातही महाविद्यालयात अशाच प्रकारचे समाजोपयोगी व विकासाभिमुख उपक्रम राबविण्यात येतील. विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाजीराव डफळे यांनी केले, तर आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











