राजापुर बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी

शहराला पुराचा वेढा; पुराच्या पाण्याची शिव स्मारकापर्यंत धडक
अनेक भागात विजपुरवठा खंडीत

राजापूर (प्रतिनिधी): शनिवारी रात्री व रविवारी सकाळपासूनच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरात पुन्हा एकदा पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आला असून या पुराच्या पाण्याने जवाहर चौकाकडे कुच करत शिवस्मारकापर्यत धडक दिली आहे. शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले असुन शहरातील अनेक रसते पाण्याखाली गेले असून राजापूर शहराला पुराचा वेढा पडला आहे.

बुधवार पासून संततधार पडणाऱ्या पावसाचा शनिवारी सकाळी काहीसा कमी झाला होता. त्यामुळे पुर ओसरून जनजीवन पुर्ववत सुरू झाले होते. मात्र शनिवारी रात्री व रविवारी सकाळपासूनच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरात पुन्हा एकदा पुर आला आहे. शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांच्या पुराच्या पाण्याने जवाहर चौकापर्यंत पुढे शिवस्मारकापर्यंत धडक देत शहर बाजारपेठेत प्रवेश केला आहे. तर शहरान निर्माण झालेली पुरपरिस्थिती आणि पावसाचा जोर लक्षात घेऊन प्रशासनाकडूनही तर्कतेतच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

पुराच्या पाण्यामुळे शहरातील छत्रपती शिवाजीपथ बंदरधक्का, मुन्शीनाका रोड पाण्याखाली गेला आहे. तर राजापूर शिळ चिखलगाव गोठणे रस्ताही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरिल वाहतुक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. शहरातील अर्जुना नदीपात्रात असलेले पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेले असून वरचीपेठ परिसरातील रस्ताही पाण्याखाली गेला आहे. राजापूरात जवाहर चौकातील एसटी वाहतुक बंद करण्यात आली आहे.

तर संततधार पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील विजपुरवठाही काही ठिकाणी खंडीत झाला आहे. काही ठिकाणी विजवाहीन्यांवर झाडे पडल्याने पोल व विजवाहिन्या तुटून विजपुरवठा खंडीत झाला आहे.

शहरातही अनेक भागात विजपुरवठा खंडीत झाला आहे. ग्रामीण भागातही पुराच्या पाण्याने अनेक गावात भातशेतीही पाण्याखाली गेली आहे. तर विजपुरवठाही खंडीत झाला आहे.

राजापूर शहरात पुराचे पाणी शिरताच तहसीलदार सौ. शीतल जाधव, पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी पुरपरिस्थीतीची पहाणी केली. नगर परिषदेच्या आपदकालीन कक्षातुन भोंगा वाजवून अतिवृष्टीबाबत इशाराही देण्यात आला.