सावंतवाडी तालुक्यात पावसाचा कहर सुरूच

घरांची पडझड : नदी नाल्यांना पूर

झाडे पडून घरांचे नुकसान : वाहतूक ठप्प

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात शुक्रवारी देखील पावसाचा कहर सुरूच होता. पहाटेपासूनच मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले होते, तर पडझडीच्या अनेक घटना घडल्या. शिरशिंगेसह अन्य भागातील भूस्खलन सदृष्य संभाव्य घटनांबाबत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात महसूल, पोलीस व आरोग्य विभाग व ग्रामपंचायत निहाल प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात आली यामध्ये आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.
गेले चार दिवस संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात मोठी पडझड झाली. सावंतवाडी शहरातील गवळी तिठा येथील मातृछाया मंगल कार्यालय येथील आबा कशाळीकर यांच्या मालकीचे भले मोठे आंब्याचे झाड जुन्या मुंबई गोवा महामार्गावर पडले. सुदैवाने यात कोणालाही कसलीही दुखापत झाली नाही.सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगरपालिकेला याबाबत माहिती दिल्यानंतर नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर, दिलीप म्हापसेकर यांच्यासह न.प. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले व वाहतूक सुरळीत केली.

चराटे येथील उर्दू स्कूलवर लगतचे झाड उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. याबाबतची माहिती मिळताच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. सुदैवाने शुक्रवारी शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी तसेच शिक्षक या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला.माजगांव उपसरपंच संतोष वेजरे यांच्या दळवीवाडा येथील घराची भिंत कोसळली. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. चार दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे मातीची भिंत कोसळली. या घटनेचा पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.
तर कलंबिस्त घनशेतवाडी येथील रामचंद्र धोंडी सावंत यांच्या शेतमांगरावर आंब्याचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले. या ठिकाणीही सुदैवाने कोणीही उपस्थित नसल्याने तसेच गुरेही या ठिकाणी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, शेतमांगराचे मोठे नुकसान झाले. ऐन पावसाळ्यात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.विलवडे येथील परशुराम महादेव दळवी यांच्या घराचे पत्र्याचे छप्पर कोसळले. वादळी सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस यामुळे हे छप्पर उडाले. यात पत्रे फुटल्याने तसेच छप्पराचा अन्य भागही तुटल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणीही या घटनेच्या वेळी कोणीही उपस्थित नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. त्याबाबतची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.