मुणगेच्या श्री भगवती देवी जत्रोत्सवाची ‘लळीताने’ सांगता

 उतररात्री मुणगे जत्रोत्सवात गर्दीचा उच्चांक

मसुरे | झुंजार पेडणेकर वाढत्या थंडीची तमा न बाळगता भाविकानी केलेली गर्दी, पालखीच्या वेळी हर हर महादेव… असा झालेला जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरात हजारो भाविकांच्या साक्षीने पालखी प्रदक्षीणा पुर्ण झाल्या नंतर देवगड तालुक्यातील मुणगे गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवी जत्रोत्सवाची सांगता मंगळवारी उत्तर रात्री लळीताच्या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमा वेळी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. देवालय परिसरात भाविकांच्या गर्दीचा महापूर आला होता. लळीताच्या कार्यक्रमा नंतर भाविकांचे नवस पेटत्या मशालीसमोर फेडण्याचा कार्यक्रम झाला.

2 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. जत्रोत्सवास प्रारंभ झाल्या नंतर देवीच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तीमय झाला होता. पाच दिवस चाललेल्या जत्रोत्सवा मध्ये दररोज गोंधळी नृत्य, भजन, पालखी, किर्तन आदि कार्यक्रम झाले. गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट व नेत्रदिपक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झळाळून गेला होता. मालवणी खाजा खरेदी करण्यासाठी मिठाई व्यावसाईकांच्या दुकानावर गर्दी झाली होती. बच्चे कंपनी खेळणी घेण्यासाठी आग्रही होती. यात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी गावात दाखल झाले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरानी जत्रोत्सवास भेट देऊन देवीचे आशिर्वाद घेतले. यावर्षी जत्रेचा परिसर वाढला होता. मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यानी आपली दुकाने थाटल्याने देवालयाच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर ग्राहकानी मोठी गर्दी केली होती. पाच दिवसामध्ये देवालयात अनेक भजनी बुवांनी आपली भजन सेवा, तसेच दिंडी नृत्य सादर केले .

भाविकाना कमीत कमी वेळेत देवीचे दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान कमीटीच्या वतीने चांगले नियोजन करण्यात आले होते. एसटी विभागाकडून यात्रा स्पेशल गाड्या मुळे भाविकांची चांगली सोय झाली. यात्रोत्सव यशस्वीपणे संपन्न झाल्याने श्री भगवती देवस्थान कमीटीच्या वतीने अध्यक्ष ओंकार पाध्ये,उपाध्यक्ष- दिलीप महाजन,सचिव- निशाद परूळेकर,

सदस्य प्रकाश सावंत, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, मनोहर मुणगेकर, अनिल धुवाळी, वसंत शेट्ये, कृष्णा सावंत, रामचंद्र मुणगेकर यानी सर्वांचे आभार मानले आहेत.