निवती किल्ल्यावर दुर्गप्रेमींकडून स्वच्छता मोहीम

श्रमदानातून बालेकिल्ल्याचा परिसर पुन्हा झळाळला 

सावंतवाडी | प्रतिनिधी : ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने, वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्यावर रविवारी ‘दुर्ग मावळा प्रतिष्ठान’ आणि ‘नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था, भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमुळे झाडीझुडपांच्या विळख्यात अडकलेला किल्ल्याचा बालेकिल्ला आता पर्यटकांच्या सहज दृष्टिक्षेपात आला आहे.

कोकणच्या किनारपट्टीवरील महत्त्वपूर्ण जलदुर्ग असलेल्या निवती किल्ल्याची तटबंदी आणि अंतर्गत भाग वाढलेल्या झाडीमुळे झाकोळला गेला होता. ही बाब लक्षात घेऊन ११ जानेवारी २०२६ रोजी दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत ही मोहीम हाती घेतली. सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत कार्यकर्त्यांनी बालेकिल्यासमोरील भाग आणि संरक्षणात्मक खंदकाजवळील काटेरी झुडपे व वाढलेले गवत उपटून परिसर स्वच्छ केला.

गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला हा भाग स्वच्छ झाल्याने किल्ल्याचे मूळ स्थापत्य आता स्पष्ट दिसू लागले आहे. या मोहिमेमध्ये दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या श्रमदान मोहिमेत भाग्यश्री वाडकर, स्वप्निल साळसकर, यतिन सावंत, हेमालता जाधव, प्रसाद पेंडूरकर आणि गणेश नाईक यांनी सक्रीय सहभाग घेतला. “किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व टिकवण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबवणे गरजेचे असून, पर्यटकांनीही किल्ल्यावर कचरा करू नये,” असे आवाहन यावेळी संस्थांच्या प्रतिनिधींनी केले आहे.