देवगड तहसील कार्यालयात राजमाता जिजामाता तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राजमाता जिजामाता यांनी शिवछत्रपतींवर घडवलेले संस्कार, त्यांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे आजच्या युवकांसाठी असलेले महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले.
महसूल सेवक प्रदीप कदम यांनी जयंतीनिमित्त उपस्थितांना संबोधित करताना राजमाता जिजामाता यांच्या संस्कारांचे आणि स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रभक्तीपर विचारांचे महत्त्व विशद केले. त्यांनी या थोर व्यक्तिमत्त्वांच्या विचारांमधून प्रशासन व समाजसेवेला दिशा मिळते, असे सांगितले.
सहायक महसूल अधिकारी संदीप हंगे यांनीही आपल्या मनोगतात जिजामाता व विवेकानंद यांच्या विचारांमधील मूल्ये, शिस्त, कर्तव्यभावना आणि युवकांसाठी असलेला प्रेरणादायी संदेश अधोरेखित केला.
तहसीलदार श्री. आर. जे. पवार यांनी जयंतीनिमित्त उपस्थितांचे आभार मानत राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर व्यक्त केला. त्यांच्या संदेशांचा आपल्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अवलंब करण्याचे महत्त्व त्यांनी यावेळी सांगितले.












