शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना
शिरगाव (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी दिलीप पाळेकर यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार, तर कोषाध्यक्षपदी पुरुषोत्तम साटम यांची निवड झाली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार माजी विद्यार्थी संघाच्या निवडीसाठी १५ जानेवारी रोजी शाळेच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेत उपाध्यक्षपदी श्यामसुंदर जाधव, सदस्यपदी नीलेश शेटये यांची निवड करण्यात आली. सल्लागार सदस्य म्हणून उपक्रमशील शिक्षक धाकलू डवरी, पालक प्रतिनिधी अजित परब, सेवानिवृत्त अधिकारी अशोक चौकेकर, तसेच सेवानिवृत्त शिक्षक म्हणून विजयकुमार कदम यांची निवड करण्यात आली.
यावेळी नूतन अध्यक्ष दिलीप पाळेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शाळा ही माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींचे आणि स्वप्नांचे माहेरघर आहे. आपण सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सुसंस्कारित भावी पिढी घडविण्यासाठी तसेच शाळेच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी कार्य करूया.”
छायाचित्र कॅप्शन:शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या नूतन कार्यकारिणीचे माजी विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.













