राजापुरात जि. प. व प. स. निवडणूकीसाठी ७१ उमेदवारांचे अर्ज दाखल

जि. प. च्या सहा गटांसाठी १९ तर पंचायत समितीच्या बारा गणांसाठी ५२ अर्ज दाखल

राजापूर (प्रतिनिधी): जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजापुरात सर्वच राजकिय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी एकच गर्दी केली होती. शिवसेना भाजपा युतीसह उबाठा व काँग्रेस पक्षाकडूनही आपल्या उमेदवारांचे अर्ज बुधवारी दाखल करण्यात आले. राजापुरात बुधवार अखेर तब्बल ७१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी १९ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५२ अर्ज दाखल झाले आहेत.
शिवसेना व भाजपाकडून महायुतीच्या उमेदवारांची यादी मंगळवारी सायंकाळी उशीरा जाहिर करण्यात आली होती. मात्र या दोन्ही पक्षातील काही इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राजापुरात महाविकास आघाडीबाबत अद्यापही कोणताच निर्णय न झाल्याने शिवसेना उबाठा व काँग्रेसकडून स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर मनसेकडूनही काही गट व गणांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेना भाजपा महायुतीकडून जिल्हा परिषदेच्या सहा व पंचायत समितीच्या बारा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यामध्ये वडदहसोळ जि. प. गटातून प्रतिक शांताराम मटकर, तळवडे जि. प. गटातुन सिध्दाली मोरे, जुवाठी जि. प. गटातून रमेश राजाराम सुद, धोपेश्वर जि. प. गटातून प्रकाश धोंडू कुवळेकर, साखरीनाटे जि. प. गटातून कोमल कल्याण नवाळे, कातळी जि. प. गटातून सोनाली वसंत ठुकरूल या शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी बुधवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जॅस्मीन यांच्याकडे उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.
तर तालुक्यातील १२ पंचायत समिती गणातील उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये वडदहसोळ पं. स. गणातून गौतम विश्राम जाधव, रायपाटण गणातून उमेश केशव पराडकर, तळवडे मधून अपेक्षा मासये, ताम्हाणे मधून समिक्षा वाफेलकर, केळवली मधून भाग्यश्री भरत लाड, जुवाठी मधून प्रसाद मोहरकर, धोपेश्वर मधून अभिजीत गुरव (भाजपा), पेंडखळे मधून राजेश हरिश्चंद्र गुरव, नाटे मधून सुवर्णा रामचंद्र बांदकर (भाजपा) तर साखरीनाटे स्पृहा काशिनाथ गुरव, अणसुरे मधून जान्हवी जितेंद्र गावकर तर कातळी मधून पंढरीनाथ मयेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल केले.
तर शिवसेना उबाठा कडून जिल्हा परिषदेच्या वडदहसोळ गटासाठी राजेश चव्हाण, तळवडे गटासाठी समिक्षा चव्हाण, जुवाठी गटासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश जैतापकर, धोपेश्‍वर गटासाठी पंचायत समितीचे माजी सभापती अभिजीत तेली, साखरीनाटे गटासाठी माजी पंचायत समिती सदस्य नलीनी शेलार, पंचायत समितीच्या वडदहसोळ गणासाठी माजी पंचायत समिती सदस्य विनोद शिंदे, रायपाटण गणासाठी विश्‍वनाथ लाड, तळवडे गणासाठी भामिनी सुतार, ताम्हाणे गणासाठी योगी डांगे, केळवली गणासाठी छाया कोकाटे, जुवाठी गणासाठी माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मयेकर, पेंडखळे गणासाठी गणेश बाईंग, धोपेश्‍वर गणासाठी कृष्णा नागरेकर, अणसुरे गणासाठी दिपाली मेढेकर, कातळी गणासाठी अजय कार्शिंगकर, नाटे गणासाठी नमिता नागले, साखरीनाटे गणासाठी अश्‍विनी शेगुळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांनी दिली.
तर, काँग्रेसकडून धोपेश्‍वर गणातून सिद्धेश मराठे, केळवली गणातून वैष्णवी कुळ्ये, साखरीनाटे गणातून श्रीमती म्हसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर मनसेकडून साखरीनाटे जि. प. गटातुन श्वेता जयेंद्र कोठारकर तर वडदहसोळ पंचायत समिती गणातुन राजेश पवार यांनी अर्ज दाखल केले आहेत.
या निवडणूकीत विविध गट व गणांतुन अपक्षांनीही दंड थोपटले असून धोपेश्वर पंचायत समिती गणातुन योगेश नकाशे, अरवींद लांजेकर, विलास गुरव यांनी तर जुवाठी जि. प. गटातुन दीपक बेंद्रे जुवाठी पंचायत समिती गणातुन प्रकाश भिवंदे यांनी तर रायपाटण पंचायत समिती गणातुन संदीप कोलते यांसह काही अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
राजापूर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. प्राप्त अर्जांची छाननी गुरूवारी २२ रोजी होणार आहे. तर २३, २४ व २७ जानेवारी या दिवशी उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत.