हर्षा ठाकूर यांचे आरोप बिनबुडाचे; देवगडमधील पाणी प्रश्नावरून तन्वी चांदोस्कर यांनी सुनावले खडे बोल

  • ​पाडाघर योजनेची थकबाकी भरून योजना लवकरच सुरू करणार.
  • ​जामसंडे वेळवाडी सडा येथील ६.६७ लाख लिटर क्षमतेची टाकी उबाठाच्या सत्तेत ४ वर्षे बंद का होती? असा सवाल.
  • ​पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार.

देवगड (प्रतिनिधी):

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती सौ. तन्वी योगेश चांदोस्कर यांनी माजी नगरसेविका हर्षा ठाकूर यांनी केलेल्या आरोपांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. ठाकूर यांनी केलेले आरोप चुकीच्या माहितीवर आधारित आणि दिशाभूल करणारे असल्याचे सांगत चांदोस्कर यांनी पुराव्यासह वस्तुस्थिती मांडली आहे.

​PMC नियुक्तीवरून आरोपांचे खंडन

​कोर्ले-सातंडी नळयोजनेच्या PMC (Project Management Consultant) नियुक्तीबाबत बोलताना चांदोस्कर म्हणाल्या की, २८ ऑगस्ट २०१७ रोजी तत्कालीन नगरपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (MGP) नियुक्ती केली होती. मात्र, सात वर्षे चार महिने उलटूनही त्यांचे काम समाधानकारक नसल्याने ३० डिसेंबर २०२४ रोजी ठराव क्रमांक ५७ अन्वये त्यांचे काम रद्द करून नवीन खासगी संस्थेला पाचारण करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक असून यावेळी उबाठा गटाचे पाच नगरसेवक उपस्थित होते, परंतु त्यांनी कोणताही विरोध केला नव्हता.

​पाणीपट्टी वाढ आणि थकबाकीचा प्रश्न

​पाडाघर नळयोजना बंद पडण्याबाबत स्पष्टीकरण देताना चांदोस्कर यांनी सांगितले की, १५ जून २०२५ रोजी वीज बिल थकल्यामुळे जिल्हा परिषदेने पाणी बंद केले होते. “मी स्वतः सभापती झाल्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून थकबाकी भरण्याची तयारी दर्शवली आहे. खराब पाइपलाइनचे काम पूर्ण होताच ही योजना पुन्हा सुरू होईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, १२ जुलै २०१८ रोजी ज्यावेळी पाणीपट्टी दरवाढीचा ठराव झाला, त्यावेळी हर्षा ठाकूर स्वतः सभागृहात उपस्थित होत्या आणि त्यांनी त्या ठरावाला पाठिंबा दिला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.

​आर्थिक भार नागरिकांवर पडू देणार नाही

​दहिबाव नळपाणी योजनेच्या १०% लोकवर्गणीच्या (सुमारे ९२ लाख रुपये) मुद्द्यावर बोलताना सभापतींनी स्पष्ट केले की, देवगड-जामसंडेच्या नागरिकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार टाकला जाणार नाही. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांच्या माध्यमातून हा निधी उभा केला जाईल. नगरपंचायतीने जमा केलेली १०% रक्कम आधीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जमा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

​कमिशनच्या आरोपांवरून मानहानीचा इशारा

​गेल्या ९ वर्षांत ४ कोटी खर्च झाल्याच्या आणि कमिशन घेतल्याच्या आरोपावर उत्तर देताना चांदोस्कर म्हणाल्या की, “या ९ वर्षांपैकी ३ वर्षे उबाठा गटाची सत्ता होती, त्यामुळे आधी त्यांनी स्वतःच्या काळातील खर्चाचा हिशोब द्यावा. १४ हजार रुपये कमिशन कोणाच्या घशात गेले, याचा शोध आधी ठाकूर यांनी घ्यावा.”

​हर्षा ठाकूर यांनी १५ दिवसांच्या आत पुराव्यासह आरोप सिद्ध करावेत, अन्यथा जाहीर माफी मागावी; अन्यथा त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा (Defamation Case) दाखल करण्याचा इशाराही तन्वी चांदोस्कर यांनी दिला आहे.