राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील शहरानजीक असलेल्या जिल्हा परिषद शाळा शीळ नं. १ येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर घोषणा, कवायतींचे सादरीकरण आणि विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण भाषणे हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.
सकाळच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढली. ‘प्रजासत्ताक दिन चिराऊ होवो’, ‘जय जवान-जय किसान’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर शालेय पटांगणात शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक सादरीकरण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर विविध कवायती सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या या शिस्तबद्ध सादरीकरणाचे उपस्थित पालक आणि मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले. यावेळी गावचे सरपंच अशोक पेडणेकर, पोलीस पाटील सौ. दुर्वा पेडणेकर, ग्रामसेवक श्री. डिगुळे यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर बालसभा पार पडली. या बालसभेचे अध्यक्षस्थान कु. दक्ष बाईत या विद्यार्थ्याने भुषविले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव नागरेकर, माजी सरपंच रविंद्र नागरेकर, रविंद्र गोंडाळ, ज्ञानसागर वाचनालयाचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ, सचिव संतोष मोंडे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा नागरेकर, मुख्याध्यापक सुरेश पवार, पदवीधर शिक्षक श्रीमती मणचेकर, श्रीमती जयश्री नाईक, अनिल बाणे तसेच शालेय व्यवस्थापन समिती व माता पालक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व विशद केले. उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये, आपले हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली. ‘विद्यार्थ्यांनी देशाच्या जडणघडणीत योगदान देताना संविधानाप्रती नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे,’ असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रात महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.










