परीक्षा काळात मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपक्रम
सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत टेलि-समुपदेशन उपलब्ध
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समुपदेशन सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणारा मानसिक ताण, भीती व नकारात्मक विचार दूर करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षित समुपदेशक विद्यार्थ्यांना आणि पालकांना दूरध्वनीवर मार्गदर्शन करतील. ही सेवा परीक्षेपूर्वी आणि परीक्षेदरम्यान उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेऊन मानसिकदृष्ट्या सशक्त राहावे, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC – इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC – दहावी) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टेलि-समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार असून दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान पार पडणार आहे.
ही परीक्षा पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर तसेच कोकण विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणार आहे. राज्य मंडळाचे सचिव दीपल माळी यांनी सांगितले की, प्रशिक्षित समुपदेशक सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोफत फोनद्वारे मार्गदर्शन करतील.
या समुपदेशन सेवेचा उद्देश परीक्षेशी संबंधित चिंता, तणाव, भीती आणि नकारात्मक विचार यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणे हा आहे. मात्र परीक्षा केंद्र, आसनव्यवस्था किंवा प्रश्नपत्रिकांबाबतच्या चौकशीसाठी समुपदेशकांशी संपर्क करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना मानसिक दबाव नियंत्रित करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमासाठी राज्य मंडळाने विशेष प्रशिक्षित सल्लागारांची नियुक्ती केली असून ते थेट फोनवरून मार्गदर्शन करणार आहेत.
समुपदेशनासाठी संपर्क क्रमांक : 9960644411, 7972573742, 9834084593, 9359978315, 8169202214, 9371661255, 7208429381, 745219, 9404783996
विद्यार्थी आणि पालकांनी या सेवेचा योग्य वापर करून परीक्षेच्या काळात मानसिकदृष्ट्या सक्षम राहावे, असे आवाहन प्रहार डिजिटलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.











