उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली; रत्नागिरी क्रिकेट क्षेत्रावर शोककळा
रत्नागिरी: रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वातील एक उमदा खेळाडू आणि ‘युवा स्पोर्टस’चे मालक प्रविण पवार यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनामुळे जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून क्रिकेट प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण पवार हे आज चिंचखरी येथे आयोजित एका क्रिकेट सामन्यात खेळत होते. मैदानावर खेळ सुरू असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
एक उत्कृष्ट फलंदाज आणि संयमी खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती. रत्नागिरीतील क्रीडा साहित्य विक्री क्षेत्रातही त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने रत्नागिरी टेनिस क्रिकेटसाठी आजचा दिवस ‘काळा दिवस’ ठरला आहे.












