उडान महोत्सवात कर्ले महाविद्यालयाचे घवघवीत यश

पोस्टर मेकिंग व वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

शिरगांव (प्रतिनिधी) :     मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित उडान महोत्सवात देवगड तालुक्यातील शिरगांव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा उडान महोत्सव मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्यातील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे पार पडला. या महोत्सवात कर्ले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला.

पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रसाद सुहास कदम व मुकेश सुधीर जाधव यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला, तर वक्तृत्व स्पर्धेत साक्षी प्रकाश शिद्रुक हिने तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना प्राचार्य समीर तारी, ॲकॅडमिक को-ऑर्डिनेटर प्राध्यापिका सिद्धी कदम तसेच विस्तार कार्यशिक्षक प्राध्यापिका सुगंधा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांना आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. कुणाल जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य व पथनाट्य स्पर्धेचे परीक्षक डॉ. विश्वंभर जाधव, कट्टा महाविद्यालयाचे संचालक अजय वराडकर, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, जिल्हा समन्वयक सुरेश पाटील, चंद्रकांत भेंकी आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, सर्व संचालक व पदाधिकारी, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, प्राचार्य समीर तारी तसेच सर्व प्राध्यापक वर्गाने अभिनंदन केले.