ओटवणे (प्रतिनिधी): कोल्हापूरवरून बांदा-गोवा दिशेने लोखंडी प्लेट व स्टील ट्यूब वाहतूक करणारा MH 09 BA 9279 क्रमांकाचा कॅन्टर विलवडे तिठा येथे पहाटे अजब अपघातात सापडला. मोठी चढण, रस्त्यावरचे खड्डे आणि गाडीत असलेला ओव्हरलोड लोखंडी माल यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
चढतीवर वाहन आवरण्याचा प्रयत्न करत असताना कॅन्टरची समोरील दोन्ही चाकं तब्बल १० ते १५ फूट जमिनीपासून उचलली गेली. काही क्षण वाहन हवेत लटकलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने मागील बाजूस असलेला लोखंडी माल खाली घसरून जमिनीवर आल्याने वाहन मागे सरकले नाही किंवा पलटी झाले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या अपघातात चालक सुखरूप बचावला असून जीवितहानी टळली आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जेसीबीच्या साहाय्याने लोखंडी साहित्य बाजूला करून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला करण्याचे काम सुरू होते. जड मालामुळे हे काम करताना मोठी कसरत करावी लागत होती.
दरम्यान, विलवडे तिठा येथील धोकादायक चढण व खड्ड्यांबाबत स्थानिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.













