विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका 

इन्सुली क्षेत्रफळ येथील घटना

बांदा : प्रवीण परब

इन्सुली क्षेत्रफळ (भिसेवाडी) येथील एका विहिरीत पडलेल्या सुमारे १३ वर्षे वयाच्या नर बिबट्याला वनविभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

 

इन्सुली येथील शेतकरी जयराम धुरी यांच्या बागेतील विहिरीतून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज ऐकू आला. त्यांनी तातडीने विहिरीपाशी जाऊन पाहिले असता बिबट्या विहिरीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती सावंतवाडी वनविभागाला दिली.

 

 

घटनेची माहिती मिळताच सकाळी ८ वाजता सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि जलद बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीनुसार, भक्ष्याचा शोध घेत असताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला.

वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केले.

 

त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बिबट्याची तपासणी करण्यात आली. बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री पटल्यानंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

 

ही मोहीम उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत वन कर्मचारी, जलद बचाव पथक आणि स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.