युद्धजन्य परिस्थितीचा पर्यटकांना फटका; रत्नागिरीतील १२ प्रवासी दुबईत अडकले

रत्नागिरी | प्रतिनिधी अमेरिका-इस्राएल विरुद्ध इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला बसला आहे. इराणने आखाती देशांतील काही शहरांवर केलेल्या हल्ल्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दुबई व अन्य आखाती देशांत फिरण्यासाठी आणि कामानिमित्त गेलेले १२ प्रवासी अडकून पडले आहेत. हे सर्व प्रवासी सध्या सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली असली, तरी त्यांच्या परतीचा मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही.

हवाई वाहतूक विस्कळीत; उड्डाणे रद्द

युद्धजन्य तणावामुळे आखाती देशांतील हवाई सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर काहींना मोठा विलंब होत आहे. विशेषतः दुबई, अबुधाबी, कतार आणि सौदी अरेबियातून प्रवास करणाऱ्या भारतीयांना मायदेशी परतताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही प्रवाशांनी पर्यायी मार्ग म्हणून दुबईऐवजी ओमानमार्गे भारतात येण्यास सुरुवात केली आहे. गुहागर तालुक्यातील नसीम इसाक साल्हे हे ओमानमार्गे मुंबईत सुखरूप पोहोचल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तीन दिवस हॉटेलबाहेर न पडण्याचे आदेश

दुबईत अडकलेल्या प्रवाशांना तेथील स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव पुढील तीन दिवस हॉटेलबाहेर न पडण्याचे कडक आदेश दिले आहेत. “माझे आई-वडील तिथे अडकले असून त्यांना बाहेर पडता येत नसल्याने आमची चिंता वाढली आहे,” असे प्रतीक जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अनिश्चित परिस्थितीमुळे अडकलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी केंद्र व राज्य सरकारकडे या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाची भूमिका

भारतीय दूतावासाकडून संबंधित प्रवाशांना आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. युद्धजन्य तणाव निवळल्यानंतरच या प्रवाशांच्या परतीचा मार्ग मोकळा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आखाती देशात अडकलेल्या प्रवाशांमध्ये प्रामुख्याने दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे:

  • दापोली: अक्षय श्रीधर फाटक, श्रेया अक्षय फाटक, शुभदा मोहन साठे.

  • संगमेश्वर: सुरेश सप्रे, ज्योती सुरेश सप्रे, जितेंद्र चंद्रकांत निमकर, रुचिता चंद्रकांत निमकर, अभिषेक जितेंद्र निमकर, मानसी जितेंद्र निमकर, श्रद्धा इंदुलकर, संदेश शेट्ये व सोनम शेट्ये.