वेंगुर्ले येथील नगरसेवकांची खासदार नारायण राणे यांच्या कडे भेट घेऊन मागणी
वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले शहरातील नगरसेवकांनी भाजप नेते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची कणकवली येथे निवासस्थानी भेट घेतली. यावर्षी बदलत्या हवामानामुळे आंबा पीक धोक्यात असून आंबा बागायतदार शेतकरी व्यापारी अडचणीत सापडले आहेत. तरी आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील आम्हा आंबा बागायतदार शेतकरी व्यापाऱ्यांना सरसकट आंबा नुकसानी मिळवून द्यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. यावर बोलताना खासदार राणे यांनी संबंधितं मंत्री यांच्या बरोबर चर्चा करून शेतकरी बागायतरांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
भाजप नेते खासदार नारायण राणे हे सिंधुदुर्गात आले आहेत. वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकी नंतर विजयी नवनिर्वाचित नगरसेवक संदेश निकम, प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, सदानंद गिरप, सुधीर पालयेकर यांनी भाजपा नेते नारायण राणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी आंबा नुकसानी बाबत सविस्तर चर्चा झाली.
सुरुवातीला आंब्याचे चांगले पिक येईल असे वाटत होते. मात्र अति थंडी, अति उष्णता आणि बदलते वातावरण यामुळे आंबा मोहोर आणि त्याला आलेली छोटी फळे गळून पडली. आता एक टक्काही उत्पादन मिळताना कठीण आहे. अंबा बागायतदार शेतकरी व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची कीटकनाशके, औषधे फवारणी करून आपल्या आंबा बागांमध्ये उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले होते. मात्र आंबा उत्पादन नसल्याने सर्वजण संकटात सापडले आहे. कर्ज काढून केलेल्या फवारण्या आणि वर्षभराची बागांची देखभाल फुकट गेली आहे. यातून सोडवण्यासाठी शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी. आपण माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री असल्याने तुम्हीच ही नुकसानी मिळवून देऊ शकता. तरी शासनाच्या माध्यमातून हे नुकसान भरपाई आपण आम्हा शेतकरी बागायतदारांना मिळवून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील वेंगुर्ले शहराला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून वेंगुर्ले शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त विकास निधी मिळावा अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.












