*अनघा निकम मगदूम, रत्नागिरी
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक नेतृत्वे येतात आणि जातात, परंतु ज्यांच्या नावाभोवती संघर्षाचे वलय आणि कर्तृत्वाची धार असते, असे नेते जनमानसात कायमचे स्थान मिळवतात. कोकणच्या सुपुत्रांपैकी एक, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार माननीय नारायणराव राणे साहेबांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेणारे आमदार निलेश नारायण राणे हे आज राज्याच्या राजकारणात एक ‘अभ्यासू आणि आश्वासक’ नेतृत्व म्हणून ताकदीने पुढे आले आहेत.
२०१४ ते २०२४ हा दहा वर्षांचा काळ त्यांच्यासाठी केवळ राजकीय वनवास नव्हता, तर तो एका नव्या, प्रगल्भ निलेश राणेंच्या जडणघडणीचा काळ होता. २००९ मध्ये तरुणपणातच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निलेश राणे यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत मजल मारली होती. मात्र, २०१४ नंतर राजकीय वाऱ्याची दिशा बदलली, पण आ. निलेश राणे हे राणेसाहेबांच्या ‘मुशीतून’ तयार झालेले नेतृत्व आहे. त्यांनी वाऱ्याच्या वेगाशीच दोन हात करत त्यांच्यातील आक्रमकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तीच वृत्ती कायम ठेवली आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केले की, निलेश राणे हे जनतेसाठी निर्माण झालेले कडवे नेतृत्व आहे. म्हणूनच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एका दशकाचा हा संघर्ष विजयाच्या गुलालात न्हाऊन निघाला.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षात संपूर्ण महाराष्ट्राने निलेश राणे यांचे एक वेगळेच रूप पाहिले. पूर्वीचे ‘आक्रमक’ निलेश राणे ‘अभ्यासू’ आमदार निलेश राणे म्हणून समोर आले. त्यांच्या आक्रमकतेला अभ्यासूपणाचे कोंदण लाभले. याची पहिली झलक २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात दिसली. कोकणी माणसाच्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी त्यांनी मांडलेले मुद्दे अभ्यासपूर्ण होते.
त्यानंतर २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तर अर्थसंकल्पावरील त्यांचे मुद्देसूद भाषण, केवळ प्रश्नच न मांडता त्यावर असलेल्या संभाव्य उपाययोजना, यावरून, त्यांना केवळ राजकारणच नाही तर राज्याचे अर्थकारणही उत्तम समजते हे आ. निलेश राणे यांनी सिद्ध केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांवर सन्माननीय राणेसाहेबांची छाप उमटल्याचे दिसून आले.
या वर्षभराच्या आमदारकीच्या काळात आ. निलेश राणे यांनी आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण कोकणचा आवाज म्हणून विधिमंडळात काम केले आहे. कोकणचा विकास हा कशावर अवलंबून आहे ते ओळखून त्यांनी किनारपट्टीच्या विकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. त्यात पर्यटन विकास हा मुद्दा अधिक प्रभावी होता.
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात जेव्हा कोकणात विजेचा लपंडाव सुरू होता तेव्हा निलेश राणे स्वतः मतदारांसाठी धावलेच पण पावसाळी अधिवेशनात त्यांनी महावितरणच्या कारभारावर बोट ठेवत यंत्रणेला तातडीने हालचाल करावी लावली. सिंधदुर्गतील जनतेच्या भूमीवर वेगवेगळे आरक्षणे आणि बंधने आहेत हे विधिमंडळात समोर आणताना आ. राणे यांनी दाखवलेल्या चणाक्षपणामुळे सरकारला या प्रश्नावर पुन्हा विचार करावा लागला आहे.
मालवण आणि कुडाळच्या पर्यटनासाठी राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत किती कमी निधी मिळतो, हे त्यांनी साधार स्पष्ट केले. त्यांच्या या मांडणीमुळे कोकणातील पर्यटन स्थळांना झुकते माप मिळण्यास मदत झाली. धर्म हा मनुष्याचा श्वास आहे, ही त्यांची धारणा आहे. म्हणूनच गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी आणि हिंदू धर्मावरील आघातांविरुद्ध त्यांनी विधानसभेत आवाज उठवला.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये निलेश राणे यांच्यातील ‘किंगमेकर’ जगासमोर आला. नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तर संपूर्ण राज्याच्या माध्यमांचे लक्ष सिंधुदुर्गाकडे, विशेषतः मालवणकडे लागून होते. यावेळी निलेश राणे यांनी ज्या संयमाने, रणनीतीने आणि आत्मविश्वासाने आपली बाजू मांडली, त्यातून त्यांच्यातील राजकीय परिपक्वता सर्वांना दिसली. कार्यकर्त्यांच्या फौजेला सोबत घेऊन निवडणूक कशी जिंकायची, याचे कौशल्य त्यांनी दाखवून दिले.
कोकणात राणे कुटुंब हे सर्वसामान्यांसाठी भक्कम आधार आहे. तर आ. निलेश राणे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार बनले आहेत. नामदार शिंदे यांनी टाकलेला विश्वास निलेश राणे यांनी आपल्या कतृत्वाने सार्थ ठरवला आहे.
आ. निलेश राणे केवळ सामन्यांचे प्रश्नच मांडत नाहीत तर त्यावर काय उपाययोजना करता येतील हेही आपल्या भाषणातून ते मांडतात आणि या मांडणीत त्याचे २० वर्षापुढचे व्हिजन असते. आ. निलेश राणे यांचा त्यांच्या मतदारसंघाच्या आणि कोकणच्या सर्वांगीण विकासाचा एक ‘मास्टर प्लॅन’ तयार आहे. त्यातील त्यांचे व्हिजन कोकणचे चित्र बदलणारे आहे. आ निलेश राणे हे पुढच्या पिढीचा विचार करणारे दूरदृष्टी असलेले नेते आहेत.
१७ मार्च हा आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस . त्या निमित्ताने एक आमदार म्हणून गेल्या वर्षभराचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या उज्वल भविष्याची केवळ एक झलक आहे. पराभवातून न खचता, टीकेला कामातून उत्तर देत, अभ्यासाने स्वतःला सिद्ध करणारा हा नेता महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर अधिक वेगाने तळपणार, यात शंका नाही. आगामी काळात त्यांच्या हातून कोकणची आणि महाराष्ट्राची अधिकाधिक सेवा घडो आणि त्यांच्याकडून महाराष्ट्र धर्म असाच जपला जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !












