जुना कात्रज घाटात मद्यधुंद चालकाची धडक; पादचारी जखमी

 

पोलिसांच्या मोटारसायकलचेही नुकसान; चालक ताब्यात
वैद्यकीय तपासणीत मद्यप्राशनाची पुष्टी

पुण्यातील जुना कात्रज घाटात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या चालकामुळे अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका पादचाऱ्याला दुखापत झाली असून पोलिसांच्या मोटारसायकलचेही नुकसान झाले. घटनेनंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अहवालात चालक दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.


पुणे : जुना कात्रज घाट परिसरात रविवारी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता मद्यधुंद चालकाने कारने धडक दिल्यामुळे मुक्तार फारुख हुसेन (३५) हा पादचारी जखमी झाला. तसेच रस्त्याच्या कडेला उभी असलेली पोलिसांची मोटारसायकलही नुकसानग्रस्त झाली.

या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार अभिजित बाठे (३२) यांनी बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सहकारनगर परिसरातील ३३ वर्षीय चालकाला ताब्यात घेतले असून नोटीस देऊन त्याला सोडण्यात आले.

पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता तो दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले. तो खेड-शिवापूर येथे मित्रांना भेटण्यासाठी जात होता.

घटनेच्या वेळी पोलिस हवालदार बाठे हे गस्तीवर होते आणि त्यांनी पुणे-सातारा रस्त्यावरील घाट भागात मोटारसायकल उभी केली होती. त्याचवेळी कात्रजकडून बोगद्याच्या दिशेने येणाऱ्या कारने मोटारसायकल व पादचाऱ्याला धडक दिली.

या अपघातात पोलिसांच्या मोटारसायकलच्या टेल लॅम्प, सायरन, स्ट्रोब लाईट आणि हेडलॅम्पचे नुकसान झाले. जखमी हुसेन यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.