आरवली येथील मालवणी भाषा साहित्य सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…
वेंगुर्ले : दाजी नाईक
भाषा हे संवादाचे माध्यम आहे आणि बोलीभाषा सातत्याने वापरात राहिली तरच ती टिकून राहते, असे मत व्यक्त करून स्वार्थी वृत्तीमुळे आपण आज विनाशाकडे चाललो आहोत. विकासाची परिभाषा कोणती याचा विचार करण्याची गरज आहे. श्रमजीवी स्थिती स्वीकारली नाही, तर पुढील जीवन कठीण आणि कष्टमय होईल. अशावेळी अशा प्रकारचे साहित्यिक कार्यक्रम फार महत्त्वाचे व सुखी जीवनाला मार्गदर्शक ठरू शकतात, असे प्रतिपादन मालवण येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्य क्षेत्राशी निगडित तथा जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी केले.
मालवणी बोली भाषेच्या सन्मानार्थ आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याने आखलेल्या आणि आरवली गावातील हॉटेल माहेर सभागृहात मंगळवारी संपन्न झालेल्या मालवणी भाषा साहित्य सोहळा या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे त्या नात्याने ते बोलत होते. या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण येथील प्रख्यात मालवणी कवी रुजारीओ पिंटो हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
साहित्य प्रेरणा कट्ट्याचा हा सलग मासिक ६५ वा कार्यक्रम होता. कार्यक्रमाची सुरुवात रविंद्र पणशीकर यांच्या मालवणी कीर्तनाने झाली. ‘हेची दान देगा देवा’ या तुकोबारायांच्या अभंगावरच्या मालवणी रुपांतरणावर त्यानी निरुपण केले. त्याना संवादिनीची साथ चिन्मय प्रभूराळकर यांनी केली,तर तबला साथ प्रसाद जोशी यांनी केली. अभंगाचे रुपांतर विनय सौदागर यानी केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंटो व अतिथी वाळके यांचे स्वागत दिलीप पांढरे यांचे हस्ते वालीच्या पेंड्या, खडखडे लाडू आणि पुस्तक देऊन करण्यात आले. वैविध्यपूर्ण आखलेल्या या कार्यक्रमात देवाक काळजी या स्नेहा राणेंच्या पुस्तकाचे परीक्षण सरोज रेडकर यानी केले; तर गजालीतली माणसे या प्रकाश सरवणकरांच्या पुस्तकाचे परीक्षण विशाखा वेंगुर्लेकर यांनी केले.
काही कवितांचे रुपांतरण सादर करण्यात आले. कुणाच्या खांद्यावर या आरती प्रभूंच्या कवितेचे रुपांतर सोमा गावडे यांनी, तर आयुष्याचं पान या मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचं रुपांतर स्नेहा नारींगणेकर यानी सादर केलं. बाळकृष्ण राणे यांनी ‘काळ्या रातीचा पिवळा सपान’ ही मालवणी भयकथा सुरेख सादर केली. राजेश वैज यानी गुरु ठाकूरांची कविता व विनय सौदागर यांनी प्रसाद जोशींची कविता सादर केली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कमलेश अणावकर लिखित ‘देवपणातला शाणपाण’ ही श्रुतिका. कमलेश, श्रद्धा राऊळ, व्यंकटेश पारकर आणि गौरेश गोसावी या युवा कलाकारांच्या सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद लाभला. याच कलाकारानी कै.मयूर खानोलकर याना श्रद्धांजली म्हणून मालवणी कवींची डबलबारी सादर केली.
शेवटच्या सत्रात दीपक पटेकर यानी अवसार, अतुल माईणकर यानी गो बाय, राजेंद्र गोसावी यानी गॅस टंचाई अशा कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रुजारीओ पिंटो यानी लोकशाय, आय, पाथर, कायच् कळणां नाय अशा अनेकोत्तम कविता सादर करीत रसिकांची दाद मिळवली. तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमास रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, ऋतुजा केळकर, रवींद्र गगनग्रास, मोहन जाधव, सचिन गावडे, राजन शिरोडकर, हेमंत झाटये,दिलीप गोडकर, रमाकांत केरकर, प्रदीप पेडणेकर, सिंधु दीक्षित, शेखर पणशीकर, भालचंद्र दीक्षित,एकनाथ शेटकर, विनायक उमर्ये, जयदीप देशपांडे, सुखदा पेडणेकर, मंगेश नाडकर्णी,देवयानी आजगावकर, इंद्राकांत प्रभू साळगावकर, श्रीपाद कामत,सुजाता केरकर, सुप्रिया गोडकर, काशिनाथ नाईक, मंदार परांजपे आणि राजेश आव्हाड आदी रसिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी केले.










