देवरूख (प्रतिनिधी):
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड महाविद्यालयातील भूगोलशास्त्राचे अध्यापक श्री. गुरुप्रसाद एकनाथ घाडी यांच्या ‘रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगराच्या समस्या आणि संधी: भू-अभिक्षेत्रिय दृष्टिकोन’ (‘PROBLEMS AND PROSPECTS OF CHIPLUN TOWN OF RATNAGIRI DISTRICT: A GEO Spatial PERSPECTIVE’) या विषयावरील संशोधन प्रबंधास मुंबई विद्यापीठाने मान्यता देत त्यांना नुकतीच विद्यावाचस्पती पदवी प्रदान केली. श्री. घाडी यांनी चिपळूण नगर आणि नगराच्या सभोवतालच्या सुमारे १६ गावांमधील आपले संशोधन पूर्ण केले आहे.
भूमी उपयोजन व भूमी आवरण, चिपळूण नगर आणि सभोवतालच्या प्रदेशाच्या समस्या, चिपळूण नगरातील पाणी गुणवत्ता विश्लेषण, चिपळूण नगरातील लोकांचा नगराच्या विकासाविषयी असणारा दृष्टीकोन, शाश्वत विकास ध्येयांचा विचार करता चिपळूण नगर आणि परिसराची स्थिती, चिपळूण नगर आणि परिसरातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जलप्रक्रिया केंद्र, भविष्यकालीन वसाहती व पार्किंगसाठी आवश्यक भूभाग इत्यादीचे स्थान सुयोग्यता विश्लेषण (Site Suitability Analysis) आणि चिपळूण नगराचा शाश्वत विकास होण्यासाठी उपाययोजना इत्यादी प्रकरणांची मांडणी आपल्या संशोधनात केली आहे.
श्री. घाडी यांनी आपल्या संशोधनाच्या पहिल्या प्रकरणात समस्येची मांडणी करताना जगाच्या वेगवेगळ्या भागात या विषयाला अनुसरून झालेल्या संशोधन साहित्याच्या मांडणीच्या आधारे संशोधनाच्या उणीवा निश्चित केल्या आणि त्या अनुषंगाने संशोधनाची उद्दिष्ट्ये निश्चित केली आहेत. दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यास क्षेत्राची भौगोलिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून मांडणी केली आहे. तिसऱ्या प्रकरणात त्यांनी सन २०१० ते सन २०२४ दरम्यान नगराच्या भूमि उपयोजन आणि भूमि आवरणात झालेला बदल आणि बदलाची कारणे याची मांडणी केली आहे. चौथ्या प्रकरणात चिपळूण नगर आणि सभोवतालची गावे यातील विविध समस्यांचा आढावा घेतला आहे. पाचव्या प्रकरणात शहराच्या विकासाबद्दल स्थानिक लोकांच्या दृष्टिकोनाची मांडणी केली आहे. सहाव्या प्रकरणात पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता यांची मांडणी केली आहे. सातव्या प्रकरणात कचरा व्यवस्थापन भूखंड, पाणी प्रक्रिया केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पार्किंगसाठीचे राखीव भूखंड यांचे स्थान सुयोग्यता विश्लेषण केले आहे.













