पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांचे उपवनसंरक्षकांना निवेदन
आंबोली विभागातील घराघरांत बॅटरी व सौरदिवे देण्याचीही मागणी
सावंतवाडी | प्रतिनिधी : आंबोली, गेळे आणि चौकुळ या घाटमाथ्यावरील गावांमध्ये गेल्या काही काळापासून हत्ती, वाघ, अस्वल आणि गवेरेडे यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या वन्यप्राण्यांकडून होणारे हल्ले आणि शेतीचे नुकसान रोखण्यासाठी वनविभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंबोली विभागाचे पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आज सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले.
आंबोली परिसरातील भौगोलिक परिस्थिती आणि घनदाट जंगल यामुळे रात्रीच्या वेळी वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून मायकल डिसोझा यांनी तिन्ही गावांतील प्रत्येक घरासाठी एक दर्जेदार बॅटरी (विजेरी) उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच, गावातील अंतर्गत रस्ते आणि वाड्यांवरील अंधार दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोलर स्ट्रीट लाईट्स (सौरदिवे) बसवण्यात यावेत, जेणेकरून प्रकाशाच्या झोतामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीपासून लांब राहण्यास मदत होईल.
आंबोली मतदारसंघातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मायकल डिसोझा यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. निवडून आल्यावर केवळ आश्वासने न देता, प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्यांनी वनविभागाकडे हा पाठपुरावा सुरू केला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पहावे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
*उपवनसंरक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद*
यावेळी उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा यांनी निवेदनाचा स्वीकार करून या विषयावर सकारात्मक चर्चा केली. वनविभागाच्या माध्यमातून शक्य असणाऱ्या उपाययोजना आणि सौरदिव्यांबाबत योग्य तो प्रस्ताव तांत्रिक बाबी तपासून मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या पाठपुराव्यामुळे आंबोली, गेळे आणि चौकुळ भागातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.












