सरपंच-उपसरपंचांना पाहणीसाठी निमंत्रण, कंपनीकडून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न
खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील कोतवली परिसरात कार्यरत असलेल्या ‘लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीविषयी गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीने पुढाकार घेत अधिकृत पत्राद्वारे हा संभ्रम दूर करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनीविरोधात कार्यरत असलेल्या कोकण नागरी संघर्ष समिती यांच्या वतीने ८ जानेवारी २०२६ रोजी मोर्चा काढून कंपनी बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. या निवेदनास कंपनीने लेखी उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
दरम्यान, विविध शासकीय यंत्रणांकडून कंपनीच्या आस्थापनेची वेळोवेळी तपासणी आणि पाहणी करण्यात आली असून, त्या सर्व प्रक्रियेत कंपनीने पूर्ण सहकार्य केले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच कंपनीकडे आवश्यक त्या सर्व शासकीय परवानग्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नियमांचे पालन होत असल्याची खात्री केल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. केंद्र व राज्य सरकारनेही या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले आहे.
कंपनीने २६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजद्वारे आपली बाजू मांडली होती, तसेच ३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेतही याबाबत सविस्तर खुलासा करण्यात आला होता. सध्या निर्माण झालेला संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे सांगत, उत्पादन प्रक्रियेबाबत सर्व आवश्यक माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. शासकीय यंत्रणा, प्रसारमाध्यमे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सर्वतोपरी माहिती देण्यासाठी कंपनी पुढाकार घेत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. याच अनुषंगाने कंपनीने कोतवली ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांना १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रकल्पस्थळी उपस्थित राहून प्रत्यक्ष पाहणी व चर्चेसाठी सहभागी होण्याचे निमंत्रण दिलं होतं. स्थानिक पातळीवर निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य करावे, अशी विनंतीही कंपनीने केली आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, प्रस्तावित पाहणी आणि चर्चेनंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










