रत्नागिरीत सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई; ३०० टन तस्करीच्या डिझेलची विक्री करणाऱ्या दोन बोटी जप्त

रत्नागिरी: प्रतिनिधी 

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे किनारपट्टीवर तस्करीच्या डिझेलची अवैध विक्री करणाऱ्या रॅकेटचा सीमाशुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तस्करीचे डिझेल विकणारी ‘रत्न माऊली’ ही बोट आणि डिझेल खरेदी करणारी दुसरी एक बोट अशा दोन बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी बोटीचा मालक आणि तांडेल अशा दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

हर्णे किनारपट्टीवर एक मासेमारी बोट इतर बोटींना तस्करीचे डिझेल विकत असल्याची गोपनीय माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, अधीक्षक (P&I) श्री. अतुल व्ही. पोतदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २१ एप्रिल २०२६ च्या रात्री समुद्रात शोधमोहीम राबवली. हर्णे किनारपट्टीपासून सुमारे ११ नॉटिकल मैल अंतरावर ‘रत्न माऊली’ ही संशयास्पद बोट पथकाला आढळून आली. २१ आणि २२ एप्रिलच्या दरम्यान मध्यरात्री ही बोट डिझेल विक्री करत असताना रंगेहात पकडण्यात आली.

पकडण्यात आलेल्या बोटींना दाभोळ जेटीवर आणण्यात आले असून, बोटीच्या कप्प्यांमध्ये साठवलेले डिझेल जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, गेल्या दोन महिन्यांत ‘रत्न माऊली’ या बोटीने विविध फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल ३०० टनांहून अधिक डिझेलची तस्करी करून विक्री केल्याचे समोर आले आहे. या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा अधिक तपास सध्या सुरू आहे.

या प्रकरणातील आरोपी (बोटीचा मालक आणि तांडेल) यांना अटक करण्यासाठी विशेष सरकारी वकील श्री. शेखर डी. टोणपे यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. दापोलीच्या माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी हा अर्ज मंजूर करत दोघांनाही कोठडी सुनावली आहे.

सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी जनतेला आवाहन केले आहे की, समुद्रकिनाऱ्यावर किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही तस्करीच्या घटना निदर्शनास आल्यास तातडीने सीमाशुल्क विभागाला कळवावे. माहिती देण्यासाठी नागरिक ८७९६८९५९९० किंवा ८४२११८८७५० या क्रमांकावर फोन अथवा व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधू शकतात. ही माहिती अधीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी लक्ष्मीकांत भाटकर यांनी दिली आहे