दोडामार्ग सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे शनिवारी सायंकाळी एका बंद घराचे कवाड फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चक्क काजूच्या पोत्यांचाही समावेश आहे. याप्रकरणी पुरुषोत्तम बळीराम देसाई यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पुरुषोत्तम देसाई हे शनिवारी सायंकाळी ७ ते ८:१५ च्या सुमारास गावातीलच एका हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाऊ कमलाकर देसाई हे घरी परतले असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता कागदपत्रे आणि पर्स अस्ताव्यस्त पडलेली दिसली. घराची पाहणी केली असता स्वयंपाकघराचा मागील दरवाजा उघडा होता, तसेच छताची ४-५ कौले काढलेली दिसून आली. चोरट्यांनी दुसऱ्या खोलीतील तीन कपाटे फोडून आतील सर्व कपडे बाहेर फेकून दिले होते.
रोख रकमेसह काजूवरही डल्ला
या धाडसी चोरीत पर्समधील ३० हजार रुपये, खिशातील १ हजार रुपये आणि एक सोन्याची नथ चोरट्यांनी लंपास केली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरात साठवून ठेवलेले २५ ते ३० किलो काजूही चोरून नेले आहेत.
दोन वर्षांपूर्वीही झाली होती चोरी
तक्रारदार देसाई यांच्या घरी दोन वर्षांपूर्वीही अशाच पद्धतीने चोरी झाली होती. मात्र, त्यावेळी केवळ ५ हजार रुपयांची चोरी झाल्याने त्यांनी पोलीस तक्रार केली नव्हती. आता मात्र मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरीला गेल्याने त्यांनी रीतसर तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.












