सागर कारिवडेकर याला अखेर अटक; सहा महिन्यांपासून होता फरार
सावंतवाडी:
सर्वोदय नगर येथे झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणी गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी सागर सुबोध कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. कारिवडे येथे आपल्या सासरवाडीला येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
२६ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री सर्वोदय नगर येथे शौनक सपकाळ (राहणार पुणे) यांच्यावर गाडी अंगावर घालून खुनाचा प्रयत्न व मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून सागर कारिवडेकर याच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी या गुन्ह्यातील इतर आरोपी तहा राजगुरू, तला राजगुरू (दोन्ही राहणार बांदा) आणि नितीन मेस्त्री (राहणार कोलगाव) यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, घटनेनंतर मुख्य संशयित सागर कारिवडेकर हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.
तो आज २६ एप्रिल रोजी रात्री ७ ते ८ च्या सुमारास कारिवडे येथील आपल्या सासरवाडीत येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार मिळालेल्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस हवालदार महेश जाधव आणि महेश निरवडेकर यांच्या पथकाने कारिवडे येथे सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेला सागर कारिवडेकर याच्यावर ठाणे आणि मुंबई येथे देखील आर्थिक व्यवहारांसंबंधी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. गुंतवणूकदार सपकाळ आणि देवकाते यांच्यावर आपल्या माणसांकरवी हल्ला व मारामारी घडवून आणल्याच्या आरोपाखाली ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे आणि जयेश खंदरकर करत आहेत.











