मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे येथील भीषण अपघातात खारेपाटण येथील रिक्षाचालकाचा मृत्यू

कणकवली / खारेपाटण : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण जवळ असलेल्या नडगिवे येथील एका अवघड वळणावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात खारेपाटण रामेश्वर नगर येथील रिक्षाचालक संदीप दिलीप पाटील (वय ४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२ च्या सुमारास घडली. या घटनेने खारेपाटण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

मयत संदीप पाटील हे रविवारी रात्री ११ च्या सुमारास आपल्या मालकीची रिक्षा घेऊन खारेपाटण येथून तळेरे येथील पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी गेले होते. गॅस भरून परत खारेपाटणकडे येत असताना, नडगिवे येथील अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची रिक्षा पलटी झाली. या अपघातात संदीप पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पं.स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे आणि खारेपाटणचे माजी सरपंच श्री. रमाकांत राऊत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संदीप पाटील यांना त्वरित खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, अपघाताच्या ठिकाणीच जास्त रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मयत संदीप पाटील यांचे सामाजिक व कौटुंबिक पार्श्वभूमी
संदीप पाटील हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांनी नुकताच रामेश्वर नगर येथील वडाच्या झाडाखाली छोटा ऑटो रिक्षा दुरुस्तीचा गॅरेज व्यवसायही सुरू केला होता. त्यांची पत्नी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘आशा’ सेविका म्हणून कार्यरत आहे. आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करणाऱ्या संदीप यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. पवन कांबळे, खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे प्रमुख मिलिंद देसाई आणि पोलीस कॉन्स्टेबल एस. डी. सावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.