दोडामार्गात ‘गो सन्मान’ अभियानासाठी भव्य रॅली; गोवंशाला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याची तहसीलदारांमार्फत मागणी

दोडामार्ग l प्रतिनिधी ;भारतीय संविधानातील मूल्यांचा आदर करत देशातील गोवंशाला ‘राष्ट्रमाता’ किंवा ‘राष्ट्रीय वारसा’ असा संवैधानिक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आज दोडामार्ग शहरात ‘गो सन्मान आह्वान अभियान’ अंतर्गत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी तालुक्यातील गोरक्षक आणि हिंदू संघटनांच्या वतीने तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

शहरातील मुख्य श्री पिंपळेश्वर चौक येथून या रॅलीला सुरुवात झाली. ‘गोमाता की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ही रॅली तहसीलदार कार्यालयावर धडकल्यानंतर, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

प्रमुख मागण्या आणि उपाययोजना:

निवेदनात भारतीय संविधानातील अनुच्छेद ४८ व ५१ अ (ग) चा संदर्भ देऊन गोवंशाच्या संरक्षणासाठी खालील मागण्या मांडण्यात आल्या आहेत,गोवंशाला ‘राष्ट्रमाता’ किंवा ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून घोषित करावे.

केंद्र शासनाने ‘केंद्रीय गोसेवा मंत्रालय’ स्थापन करून गोसंवर्धनासाठी कठोर कायदे करावेत, गोवंश तस्करी आणि अवैध कत्तल हे गुन्हे ‘दखलपात्र’ व ‘विना-जामीनपात्र’ घोषित करावेत गोवंशाला ‘कायदेशीर व्यक्ती’ म्हणून मान्यता मिळावी. प्रत्येक जिल्ह्यात आदर्श गोशाळा व नंदीशाळा स्थापन कराव्यात, तसेच महामार्गांवर गोवंशासाठी रुग्णवाहिका व उपचार केंद्रे असावीत,शालेय अभ्यासक्रमात ‘गो-विज्ञान’ विषयाचा समावेश करावा आणि आत्मनिर्भर भारतासाठी गोआधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे.आदी मागण्या केल्या आहेत

यावेळी बोलताना अभियानाच्या सांगितले की, गोवंश हा भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, सध्या वाढती तस्करी आणि अवैध कत्तलींमुळे ही संपत्ती धोक्यात आली आहे. गोआधारित शेतीशिवाय ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या आंदोलनात तालुक्यातील असंख्य गोरक्षक, हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

छाया सुहास देसाई