डॉक्टरांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध : हल्लेखोरावर कडक कारवाई करा

डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांची मागणी

डॉक्टरांवरील हल्ले खपवून घेणार नाही : डॉक्टर्स फ्रॅटर्निटीचा इशारा

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वैभव मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही जिल्ह्यातील सर्व डॉक्टर वैभव मोरे यांच्या पाठीशी आहे. डॉक्टरांवरील हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. संबंधित हल्लेखोर यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे तसेच तालुकाध्यक्ष डॉ. संजय मराठे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

26 एप्रिल रोजी एका ९ वर्षीय बालकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. त्या बालकाच्या कुटुंबावर झालेला हा दुर्दैवी आघात आम्ही डॉक्टर्स मंडळी समजू शकतो. त्या परिवाराच्या दुःखiत आम्ही सहभागी आहोत. तथापि, त्या बालकाचा मृत्यू उपचारापूर्वीच झालेला आहे. हे घोषित केल्यानंतर, संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मोरे यांना मारहाण करून त्यांच्या सह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करत रुग्णालयाची तोडफोड केली. या घटनेचा डॉक्टर संघटनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत आहे.

डॉक्टर हे समाजाच्या आरोग्यासाठी अहोरात्र सेवा देत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक आहे. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉक्टर संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे खालील मागण्या करण्यात येत आहेत. या घटनेतील सर्व दोषींनवर कडक कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. रुग्णालयातील तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कायदे प्रभावीपणे राबविण्यात यावेत. असे निवेदनात डॉ पाताडे यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. वैभव मोरे यांची भेट घेतली. त्यांना सर्वांनी धीर दिला आहे. यावेळी वैभववाडी डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब अध्यक्ष डॉ. संजय मराठे, उपाध्यक्ष डॉ प्रविण मेस्त्री,
सचिव डॉ अमित गोखले,
खजिनदार डॉ. उपेंद्र हिर्लेकर,डॉ वासूदेव हिर्लेकर,डॉ शिवाजी पाटील, डॉ युवराज निकम, डॉ चंदन धावले व अन्य डॉक्टर उपस्थित होते.