आंबा व काजू बागेची काळजी घेण्याचे आवाहन
रत्नागिरी: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात २९ एप्रिल ते ०३ मे २०२६ या कालावधीत हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होऊन ते ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, ३ ते ९ मे या विस्तारित काळात कोकण विभागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आंबा व काजू बागांचे व्यवस्थापन
वाढत्या उष्णतेचा ताण टाळण्यासाठी नव्याने लागवड केलेल्या आंबा, काजू, सुपारी व नारळाच्या रोपांना शेडनेट किंवा झावळ्यांच्या सहाय्याने सावली करावी. हापूस आंब्याची काढणी सकाळी १० वाजेपूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर ‘नूतन’ झेल्याच्या सहाय्याने करावी, जेणेकरून फळांमधील ‘साका’ होण्याचे प्रमाण कमी राहील. फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागेत प्रति एकरी दोन ‘रक्षक’ सापळे लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काजू उत्पादकांनी पक्व बी व बोंडूची वेचणी करून बिया तीन दिवस उन्हात नीट वाळवाव्यात.
पीक व भाजीपाला सल्ला
-
हळद लागवड: हळदीची लागवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिन्यात करणे फायदेशीर ठरते. लागवडीपूर्वी जमिनीची १८-२२ सें.मी. खोल नांगरणी करून त्यात हेक्टरी २५-४० टन शेणखत मिसळावे.
-
भाजीपाला व कडधान्य: मूग पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्यास वेळेवर पाणी द्यावे आणि शेंगांची काढणी सकाळी करावी. भेंडी, नारळ आणि सुपारी या पिकांना जमिनीच्या मगदुरानुसार ४ ते ६ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
पशुधन व कुक्कुटपालन
वाढत्या उष्णतेमुळे पशुधनास पुरेसे स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी चाऱ्यावर १% गूळ व ०.५% मिठाचे द्रावण शिंपडावे, तसेच दुपारच्या तीव्र उन्हात जनावरांना चरण्यास बाहेर सोडू नये. कुक्कुटपालनामध्ये पक्ष्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी खाद्य द्यावे आणि पाण्याची भांडी वाढवावीत.
विशेष सूचना: जंगलात वणवा लागण्याची शक्यता असल्याने आंबा व काजू बागांच्या संरक्षणासाठी बागेभोवती वणवा निरोधक पट्टे काढावेत. अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांशी संपर्क साधावा.











