“माझी लाडकी बहीण” योजनेसाठी महिलांकडून पैशांची मागणी केल्यास कारवाई होणार

मंत्री शंभूराज देसाई यांचे विधानसभेत निवेदन

योजनेच्या नावाखाली महिलांकडून पैसे उकळले जात असल्याचा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून अधिवेशनात प्रश्न उपस्थित

संतोष राऊळ (विधान भवन)
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार. अशी माहिती विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून उपस्थित झालेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.असेही ते म्हणाले. त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्र्यांनी सांगितले आहे.

योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात काल विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. असे निवेदन सभागृहात केले.