कणकवली तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी ५८ टक्के मतदान

दारिस्ते, तळेरे येथे सदस्य पदासाठी तर घोणसरी सरपंचपदासाठी निवडणूक

 

कणकवली :

कणकवली तालुक्यातील दारिस्ते, तळेरे व घोणसरी या 3 ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी

एकूण सुमारे ५८ टक्के मतदान झाले. दारिस्ते, तळेरे ग्रा.पं.च्या प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी व घोणसरी सरपंचपदासाठीची निवडणूक झाली. मतमोजणी बुधवार २९ एप्रिल रोजी सकाळी १० वा. तहसिलदार कार्यालय , कणकवली येथे होणार आहे.

 

दारिस्तेत सर्वसाधारण स्त्री या एका जागेसाठी प्रिती कदम व पूजा गुरव यांच्यात लढत होत आहे. याठिकाणी एकूण ३६३ पैकी २२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरूष ११३ व स्त्रीया १११ असून एकूण ६१.७१ टक्के मतदान झाले. तळेरेच्या सर्वसाधारण जागेसाठी सागर डंबे व आदित्य महाडिक यांच्यात लढत होत आहे. याठिकाणी ६७८ पैकी ४०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरूष २१० व स्त्रीया १९१ असून एकूण ५९.१४ टक्के मतदान झाले. तर घोणसरीच्या सरपंच पदासाठी अनंत गुरव व प्रसाद राणे यांच्यात लढत होत असून येथे १७७० मतदारांपैकी ९३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. यात पुरुष ४७९ व स्त्रीया ४५८ असून एकूण ५२.९४ टक्के मतदान झाले.

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षांसह मतदान अधिकारी एक, दोन व तीन, व्यवस्थापक, शिपाई व पोलीस कर्मचारी असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.