ड्रेसिंग रूममध्ये व्हॅप वापरल्याचा आरोप
सोशल मीडियावर टीका; बीसीसीआयकडून कठोर कारवाईचे संकेत
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याच्यावर आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये व्हॅप वापरताना तो दिसल्याने ही कारवाई झाली. त्याला मॅच फीच्या 25 टक्के दंडासोबत एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. परागने आपली चूक मान्य करत शिक्षा स्वीकारली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याला आयपीएल 2026 मधील पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल मॅच फीच्या 25 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. ही कारवाई कलम 2.21 अंतर्गत लेव्हल 1 गुन्हा म्हणून करण्यात आली आहे, ज्यामध्ये “खेळाची बदनामी करणारे वर्तन” समाविष्ट आहे.
मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात हा प्रकार घडला. थेट प्रक्षेपणादरम्यान रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये व्हॅप वापरताना दिसला, ज्यामुळे ही घटना चर्चेत आली. आयपीएल मीडिया सल्लागाराने याबाबत माहिती देताना सांगितले की, परागने आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे.
परागने आपला गुन्हा कबूल केला आणि सामनाधिकारी अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली. आयपीएल नियमांनुसार लेव्हल 1 गुन्ह्यासाठी औपचारिक सुनावणीची आवश्यकता नसते आणि थेट दंड व डिमेरिट पॉइंट लागू केला जातो.
व्हिडिओ पुरावा समोर आल्यानंतर ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. मैदानावरील पंच तन्मय श्रीवास्तव आणि नितीन मेनन यांनी या घटनेचा अहवाल सादर केला असल्याचे प्रहार डिजिटल च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
आयपीएल प्रशासनाने पुढे सांगितले की, बीसीसीआय स्पर्धेची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी आवश्यक असल्यास अधिक कठोर कारवाईचे पर्यायही तपासत आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली असून, भारतात ई-सिगारेटवर 2019 पासून बंदी असल्यामुळे हा मुद्दा अधिक संवेदनशील ठरला आहे.












