रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; शिळ मिरजोळे परिसरात गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त

रत्नागिरी: प्रतिनिधी
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आणि कोकण नगर चौकीच्या अधिकारी व अंमलदारांनी संयुक्त कारवाई करत शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या एका गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला असून, एका आरोपीला रंगेहात पकडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहरात गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस पथक शहरातील विविध भागात गोपनीय माहिती गोळा करत होते.

आज दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आणि त्यांचे पथक शिळ मिरजोळे परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी स्वरूपानंद सुभाष कदम (वय ३० वर्षे, रा. शिळ कदमवाडी) हा तरुण संशयास्पद रित्या दिसून आला. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, तो प्रत्यक्ष गावठी हातभट्टीची दारू तयार करत असताना रंगेहात मिळून आला.

पोलिसांनी या कारवाईत साधारण ८९,०५०/- रुपये किमतीचे गूळ आणि नवसागर मिश्रित कुजके रसायन तसेच तयार गावठी हातभट्टी दारू जप्त केली आहे. हा सर्व मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला असून, आरोपी विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी टीम
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, तसेच पोलीस कर्मचारी दीपक साळवी, राजेंद्र सावंत, अमिता पाटील, उमेश पवार, भालचंद्र मयेकर, अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.