१५ मे २०२६ रोजी कुटुंबासमवेत आमरण उपोषण; पालवणीतील शेतकऱ्याचा इशारा

मंडणगड, प्रतिनिधी:
मंडणगड तालुक्यातील पालवणी येथील शेतकरी सुधीर नारायण पालवणकर यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीवरील विकास कामात होत असलेल्या अडथळ्यांविरोधात १५ मे २०२६ रोजी मंडणगड तहसिल कार्यालयाचे बाहेर त्यांचे कुटुंबासमवेत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तहसिलदार मंडणगड यांतेकडे ३० एप्रिल २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनातील माहीतीनुसार
पालवणी (रोहिदासवाडी) येथील भूमापन क्रमांक 10/2 मधील सुमारे 40 गुंठे जमीन तपालवणकर यामचे मालकीची असून, त्या ठिकाणी ते अनेक वर्षे वनआधारित शेती करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आंबा व काजू लागवडीसाठी जमीन विकसित करण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. यासाठी मंडणगड भूमीअभिलेख कार्यालयामार्फत हद्द कायम मोजणी करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, 28 मार्च 2026 रोजी झाडझुडपे काढणे व कूपनलिका खोदकामासाठी यंत्रणा आणली असता, काही स्थानिकांनी कामगारांना अडवून काम बंद पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याचाही दावा त्यांनी केला.
या संदर्भात तंटामुक्त ग्राम समिती, मंडणगड पोलीस ठाणे तसेच तहसील कार्यालय व पंचायत समितीकडे तक्रारी दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 5 मार्च 2026 रोजी संबंधितांविरुद्ध अदखलपात्र गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंना 1 एप्रिल२०२६ रोजी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे सांगितले होते. मात्र, पालवणकर उपस्थित राहिले असताना दुसरी बाजू गैरहजर राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
“माझ्याकडे जमिनीचे सर्व कायदेशीर पुरावे असूनही मला शेती करण्यापासून रोखले जात आहे. प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संबंधितांना कायद्याचे भय उरलेले नाही,” असे पालवणकर यांनी सांगितले.
तसेच, संबंधित व्यक्तींनी ग्रामपंचायतीकडे चुकीची कागदपत्रे सादर करून घरपट्टी नोंद केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. स्थानिक शेतकऱ्यांना प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, न्याय न मिळाल्यास १५ मे २०२६ रोजी कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.
या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.