चिपळूण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे मुंल्याकन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील समिती चिपळूणात दाखल झाली आहे. या समितीने २८ ग्रामपंचायतींच्या मुल्यांकनास सुरवात केली आहे. या मुल्यांकनातून तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीस १५ लाख तर जिल्हा स्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीला ५० लाखाचे बक्षिस मिळणार आहे. हे बक्षिस मिळण्यासाठी मोजक्या ग्रामपंचायतींची लघीनघाई सुरू आहे.
ग्रामपंचायत कामकाजाला गती मिळावी, पारदर्शक कारभार व्हावा, गावस्तरावर शासनाच्या प्रत्येक विभागाने दिलेले उद्दीष्ट पुर्ण करावे, लोकसहभागातून विकास कामांना चालना मिळावी, नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले जावेत. यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवले. गेले वर्षभर या अभियानाचे काम सुरू आहे. अभियान कालावाधीत केलेल्या कामाचे मुल्यांकन करण्याचे काम सध्या राज्यभरात सुरू आहे. यासाठी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रतिक चनावार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. जंजाळ, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीं. धोंडगे, सहायक श्री. महाभंरे यांचा सहभाग असलेली समिती चिपळूण तालुक्यात दाखल झाली आहे. गेल्या दोन दिवसात या समितीने तालुक्यातील वालोपे, खांदाटपाली, दळवटणे, पेढांबे, पिंपळी, वेहेळे, धामणवणे, भोम, मालघर, पाथर्डी, पाचाड, आदी गावांचे मुल्यांकन केले आहे. या अभियानात केलेल्या कामानुसार ग्रामपंचायतींनी गुण जाहीर केले आहेत. या जाहीर केलेल्या गुणांची आणि त्यातील कामांची पडताळणी समिती करत आहे. ग्रामपंचायत इमारत, शोषखड्डे, रोजगार हमीचे कामे, शाळा, अंगणवाड्या, सोलारचा वापर, सिसीटिव्ही यंत्रणा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे, घरपट्टी व पाणी पट्टी वसुली, संकलीत केलेली लोकवर्गणी व त्यातून केलेले काम आदीं विविध बाबींची तपासणी केली जात आहे. या बाबींची पडताळणी करून तालुक्यात पहिल्या तिन ग्रामपंचायतींची निवड ही समिती करणार आहे. या समिती सोबत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मिलींद केळसकर, भास्कर कांबळे हे काम पाहत आहेत. तालुकास्तरावरील प्रथम ग्रामपंचायतीस १५ लाख, द्वितीय १२ लाख आणि तिसऱ्या क्रमांकावरील ग्रामपंचायतीस ८ लाखाचे बक्षिस मिळणार आहे. या अभियानासाठी राज्य सरकारकडून प्रत्येक तालुक्यास २ लाख १० हजार रूपये अदा करण्यात आले आहेत. हा निधी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांना वितरीत झाल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.












